डीसीसी बँक : निराधारांच्या पगारी, फेर कर्ज व नवीन पीक कर्जाचे वितरण करावे...

 
- आ.राणाजगजीतसिंह पाटील

डीसीसी बँक : निराधारांच्या पगारी, फेर कर्ज व नवीन पीक कर्जाचे वितरण करावे...

उस्मानाबाद - कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता निराधारांच्या पगारी, कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना फेर कर्ज व नवीन पीक कर्जाचे वितरण जिल्हा मध्यवर्ती बँक, उस्मानाबादने जलदगतीने करावे असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

आ. पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँक, उस्मानाबादच्या सर्व संचालकांशी ऑडिओ ब्रिज या तंत्राचा वापर करत संवाद साधला, यावेळी आ. पाटील यांच्या सोबत बँकेचे अध्यक्ष श्री. सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष श्री. कैलास शिंदे, व्यवस्थापकीय संचालक श्री. भुक्तार व सर्व संचालक सहभागी होते.

यावेळी सर्व संचालकांनी कोविड-१९ च्या साथीने उदभवलेल्या संकटात जिल्हा मध्यवर्ती बँक बाबत विविध विषयावर चर्चा केली. बँकेच्या मार्च अखेरची आकडेवारी अध्यक्ष श्री. बिराजदार यांनी सर्व संचालकांसमोर मांडली. मागील वर्षी बँकेचा CRAR ९.७६ असून कर्जमाफीसाठी बँकेस ६० कोटी मंजूर आहेत त्यापैकी ३६ कोटी आज मितीस बँकेकडे जमा झालेले आहेत.

शेतकऱ्यांकडे सद्यस्थितीला कसल्याही प्रकारची रक्कम उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पेरणी व पेरणीपूर्व मशागतीसाठी पैसे उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यासाठी ज्यांचे पीक कर्ज माफ झालेले आहे अशांना नियमानुसार फेर कर्ज व इतर शेतकऱ्यांसाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणेबाबत बँकेने पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे आ. पाटील यांनी आवर्जून सांगितले. सर्व संचालकांनी ऑनलाईन ZOOM व्हिडीओ कॉल द्वारे एक मीटिंग घेऊन या संबंधित निर्णय घेण्याचे ठरले. यानुसार येत्या काही दिवसात अशी मीटिंग घेऊन महत्वाचे निर्णय घेण्यात येतील.

जिल्ह्यातील निराधारांची ३ महिन्यांची पगार एकत्रित जमा होत असल्याने त्याच्या जलद वितरणाकडे आवर्जून लक्ष देण्याचे आ. पाटील यांनी सूचित केले. त्यासाठी फिरत्या ATM गाडीचा नियोजनबद्ध वापर व्हावा तसेच वेळापत्रक ठरवून गावो-गावी जाऊन बँकेच्या अधिकाऱ्यांमार्फत १५ दिवसात या रकमेचे वाटप लाभार्थ्यांना करण्याचे ठरले. हे वाटप करत असताना तेथे फेस मास्कचा वापर, सॅनिटायझरची सोय, एकमेकांमध्ये अंतर ठेवणे (सोशल डिस्टंसिंग) हे अनिवार्य करून त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच महसूल व स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य घेणेबाबत आ. पाटील यांनी सांगितले.

या परिस्थितीत बॅंकेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंदाजे ३५० कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करून सदर विषय हा बोर्ड मिटिंग मध्ये घेण्याचे ठरले. तसेच बँकेच्या सर्वच शाखेत आवश्यक मास्क आणि सॅनिटायजरची सोय करण्यात आली असल्याचे अध्यक्ष श्री. बिराजदार यांनी यावेळी सांगितले.

From around the web