नागोबावाडीचा रुग्ण जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात
Jul 2, 2020, 13:54 IST
आरोग्य यंत्रणा हादरली
उस्मानाबाद - बार्शी तालुक्यातील नागोबाची वाडी येथील कोरोनाग्रस्त रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याने अनेकजण हादरून गेले आहेत. हा रुग्ण इतर आजाराच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल असल्याने त्याच्याशी १५ ते २० आरोग्य कर्मचारी, विविध तंत्रज्ञांचा संपर्क आला असून या कर्मचाऱ्यांना क्वाॅरंटाइन केलेले नसल्याने त्यांच्यामध्येच भीतीचे वातावरण आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा शासकीय रुग्णालयात बार्शी तालुक्यातील नागोबाचीवाडी येथील एक रुग्ण उपचारासाठी दाखल होता. यावेळी सदरील रुग्णाची वेगवेगळ्या पातळीवर तपासणी केल्याचे तसेच काही डॉक्टर व अनेक आरोग्य कर्मचारीही या रुग्णाच्या संपर्कात आल्याचे कळते. मात्र, त्यानंतर या रुग्णामधील लक्षणावरून स्वॅबची तपासणी केल्यावर त्याचा अहवाल ( ३० जून ) पॉझिटीव्ह आल्याने ही संपर्कातील यंत्रणा चांगलीच हादरून गेली आहे.
विशेष म्हणजे कोरोनाबाधीतांशी संपर्कात आलेल्यांना क्वाॅरंटाईन करण्यात येते. परंतु, या रुग्णाच्या संपर्कातील आरोग्य कर्मचाऱ्यांना बुधवारी दुपारी उशिरापर्यंत क्वाॅरंटाईनबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे काही कर्मचाऱ्यांशी केलेल्या चर्चेतून समोर आले आहे.
उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी आमचा नवीन अँप डाऊनलोड करा.