कोविड-१९ च्या योग्य निदानासाठी सामान्य रुग्णालयात एच.आर.सि.टी. स्कॅनिंग तातडीने सुरु होणार

 

कोविड-१९ च्या योग्य निदानासाठी सामान्य रुग्णालयात एच.आर.सि.टी. स्कॅनिंग तातडीने सुरु होणार


उस्मानाबाद - शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे नवीन सी. टी. स्कॅन मशीन असून देखील कोविड - १९ च्या रुग्णांच्या योग्य निदान चाचणीसाठी अतिशय उपयुक्त व मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असलेले छातीचे एच.आर.सी.टी. स्कॅन केले जात नाहीत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून एच.आर.सी.टी. स्कॅनिंग तातडीने सुरु करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती व त्या अनुषंगाने उद्यापासून ही निदान प्रक्रिया सुरु होणार आहे.दि. २१ ऑक्टोबर, २०१९ रोजी नवीन सी.टी. स्कॅन मशीन शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे कार्यान्वयीत करण्यात आली होती. सदरील मशिन कॅनॉन कंपनीची असुन १६ स्लाईसची आहे व त्या द्वारे axial scanning पद्धतीने स्कॅन केले जाते. सध्यस्थितीत या मशिनद्वारे प्रति महिना ३५० ते ४०० पेशंटचे सी. टी. स्कॅन होत आहे, याद्वारे ब्रेन व PNS स्कॅन केले जात आहे.कोविड-१९ च्या लढ्यात संक्रमित रुग्णांची निदान चाचणी करत असताना RT-PCR व Rapid Antigen Test (जलद प्रतिजैविक चाचणी) सह छातीचा एच.आर.सी.टी. (उच्च-रिझोल्यूशन संगणकीकृत टोमोग्राफी) स्कॅनिंग घेणे उपयुक्त असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. कोविड-१९ च्या संसर्गामुळे रुग्णाच्या छातीत विषाणूचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे पाहून रुग्णांना योग्य औषधोपचार करणे शक्य होते व रुग्णांची स्थिती बिघडण्यापासून बचाव करण्यास मदत होते, याबाबत आ. पाटील यांनी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली.उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत वर्षी खरेदी करून कार्यान्वयीत करण्यात आलेल्या सी.टी. स्कॅन मशीन चा उपयोग एच.आर.सि.टी. स्कॅनिंग साठी होत नसल्याने आ. पाटील यांनी हे मशीन कोविड -१९ ची लागण झालेल्या रुग्णाच्या छातीचा एच.आर.सी.टी. स्कॅनिंग करणेसाठी तातडीने वापरण्यात यावी अशी मागणी मा. आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्या दि.१९.०७.२०२० रोजीच्या उस्मानाबाद दौऱ्या दरम्यान झालेल्या बैठकीत केली होती.हापकीन च्या माध्यमातून हे सी.टी. स्कॅन मशीन शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे घेण्यात आले होते. हापकीन जीव-औषध निर्माणमहामंडळाच्या संचालकांशी या मशीनबाबत बोलणे झाले आहे. अशाच मशीन महाराष्ट्रात इतरत्र देण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी एच.आर.सि.टी. स्कॅन नियमित केले जाते. याच प्रमाणे उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयात सी. टी. स्कॅन मशीन सध्या तिथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून अथवा प्रशिक्षित कर्मचारी घेऊन तात्काळ सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने युद्ध पातळीवर कार्यवाही करण्यात आली आहे व उद्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे एच.आर.सि.टी. स्कॅनिंग सुरु होणे अपेक्षित आहे.

From around the web