उस्मानाबादेत शिवजयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन

उस्मानाबादकारांना आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
 
उस्मानाबादेत शिवजयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन

उस्मानाबाद : संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदा शिवजयंती निमित्त संपूर्ण आठवडाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य, चला हवा येऊ द्या आणि कॅमेडीची बुलेटट्रेन फेम कलाकारांची धमाल हसवणूक, सोबतीला अवीट संगीताची दर्जेदार मैफिल, यासह व्याख्यान, विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबीर, पारंपरिक मिरवणूक अशा भरगच्च कार्यक्रमांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा पुढील आठवडा आनंदमय जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध प्रकारच्या दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दि, 14 सायंकाळी बिव्हीजी ग्रुपचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांच्या व्याख्यानाने या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या उपस्थितीत मंगळवारी दि, 16 रोजी मल्टिपर्पज हायस्कुलच्या मैदानावर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी दि,19 रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला महाभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर सकाळी ठीक 11 वाजता शिवमूर्ती पूजन आणि सायंकाळी 5 वाजता जिजामाता उद्यान येथून पारंपारिक मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी प्रमुख आकर्षण असलेल्या चार दिवसाच्या महोत्सवाला रविवार 21 फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. छत्रपती संभाजी राजे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागील महात्मा फुले मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दि, 22 रोजी चला हवा येऊ द्या आणि कॅमेडीची बुलेटट्रेन फेम कलाकरांची धमाल हसवणूक यावेळी अनुभवता येणार आहे. सोबतीला इंडियन आयडॉल फेम  गायकांची जुगलबंदीही रंगणार आहे. त्यानंतर सोमवार दि, 23 ते बुधवार दि, 24 असे सलग तीन दिवस आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य अशी ख्याती असलेल्या "शंभू राजे" या महानाट्याचा धगधगता कलाविष्कार उस्मानाबादकारांना अनुभवायला मिळणार आहे. 

चाळीस बाय ऐंशी आकाराचा मंच
चार दिवस चालणाऱ्या महोत्सवासाठी चाळीस बाय ऐंशी आकाराचा भव्यदिव्य मंच उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पूजन करून शनिवारी दि,13 रोजी मंच उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदाणी, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, राम मुंडे, रुद्र भुतेकर, डॉ. धीरज वीर, मदन कुलकर्णी, दौलत निपाणीकर यांच्यासह मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमाचा लाभ घ्या, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांनी केले आहे.
 

From around the web