राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडयाची जिल्हा रुग्णालयात सुरुवात

 
s

 उस्मानाबाद - राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दि. 25ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये 36 वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजर करण्यात येत आहे. दि 25 ऑगस्ट-2021 रोजी येथील जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडयाचे उद्घाटन आणि नेत्रदान जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी.के. पाटील यांच्या हस्ते पंधरवाडयाचे उद्घाटन करण्यात आले.

       यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सचिन देशमुख, कोविड नोडल अधिकारी डॉ.इस्माईल मुल्ला, डॉ.नानासाहेब गोसावी आणि नेत्रविभागाचे प्रमुख डॉ.अर्चना गोरे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.मुस्तफा पल्ला,डॉ.विरभद्र कोटलवाड, डॉ.महेश पाटील, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रेणुका भावसार, अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे , नेत्रविभागाचे वॉर्ड इन्चार्ज रऊफ शेख तसेच नेत्रविभागातील सर्व अधिपरिचारिका आणि वर्ग-4 कर्मचारी आणि रुग्णालयातील सर्व नर्सिंग स्टाफ ,अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

     डॉ.महेश पाटील यांनी नेत्रदान आणि अंधत्वा बाबतची सद्यस्थिती तसेच नेत्रदानाची आवश्यकता आणि महत्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी राजेंद्र दिलपाक यांनी आपल्या पत्नीचे मृत्यूनंतर नेत्रदान करुन दोन अंध व्यक्तीना जग पाहण्यासाठी संधी दिली. त्यामुळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र दिलपाक आणि त्यांचा मुलगा सचिन दिलपाक यांचा सत्कार करण्यात आला.

        यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकितसक डॉ.सचिन देशमुख यांनी नेत्रदानाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे आणि यांची  सुरुवात ही स्वत:पासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.डी.के. पाटील यांनी नेत्रदान आणि अवयवदान या चळवळी समजून प्रत्येकांने यामध्ये सहभाग वाढविणे गरजेच आहे. नेत्रदान आणि अवयवदान समंतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले.नेत्रदान पंधरवडा अंतर्गत ग्रामीण,उपजिल्हा,प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर जनजागृती करिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोविड-19 या साथरोगाच्या काळात कोविड रुग्णाना उत्कृष्ट सेवा दिल्याबददल वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी व नर्सिंग स्टॉफ यांचा उपस्थित मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रविभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करुन संतोष पोतदार यांनी आभार मानले.

From around the web