मेडिकल कॉलेज : कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकारण सुरु
उस्मानाबाद - उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्याअगोदरच या महाविद्यालयाला कोणाचे नवा द्यायचे, यावरून राजकारण सुरु झालं आहे. त्यात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नामांतराबाबत उडी घेतल्याने राजकारण आतापासून तापले आहे.
उस्मानाबादला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली होती. आता शासनाने पीपीपीची अट रद्द करून हे महाविद्यालय पूर्णतः शासनाच्या अधिपत्याखाली राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता या महाविद्यालयास अमुक - अमुक नाव द्यावे म्हणून दररोज मागणी सुरु झाली आहे.
उस्मानाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी प्रबोधन मंचने केली आहे तर महाविद्यालयास संत श्री गोरोबा काकांचे नाव द्यावे, अशी मागणी हभप निलेश झरेगावकर आणि काही वारकरी संप्रदायातील लोकांनी केली आहे.
त्यानंतर भाजप आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वातंत्र्यसेनानी भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन एका शिष्टमंडळाला दिले आहे.
उस्मानाबादच्या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास अमुक - अमुक नाव द्यावे यासाठी दररोज नवनवीन नावे पुढे येत असून, यावरून राजकारण तापत आहे.
यासंदर्भात शिवसेना आ. कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की , कोणत्याही नावास आपला विरोध नाही, मात्र अगोदर महाविद्यालय सुरु होवू द्या, नंतर नाव काय द्यायचे ते ठरवू या. यावर आपण कसलेही राजकारण नसून, महाविद्यालय लवकरात लवकर कसे सुरु होईल, याला आपली प्राथमिकता असल्याचे सांगितले.