धाराशिव शहरात उद्या महिलांसाठी भव्य मंगळागौरी स्पर्धा
धाराशिव - धाराशिव शहरात लेडीज क्लबच्या वतीने उद्या ( २९ ऑगस्ट ) महिलांसाठी भव्य मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ५० हजार तर दुसऱ्या आणि तिसऱ्या येणाऱ्या संघास अनुक्रमे ३० हजार आणि २० हजार बक्षीस दिले जाणार आहे.
ग्रामीण भागात श्रावण महिन्यात महिला एकत्र येवून मंगळागौरी म्हणतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाव म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी दिली.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आतापर्यत २० संघानी नोंदणी केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटामुळे मंगळागौरी शहरी भागात सुद्धा लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे यंदा ही स्पर्धा अधिक रंगतदार होईल, असे सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले.
लेडीज क्लबच्या मैदानावर उद्या दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा फक्त महिलांसाठी असल्याने पुरुषाला येथे येण्यास बंदी आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी लेडीज क्लबच्या सर्व सदस्या परिश्रम घेत आहेत.