धाराशिव शहरातील रेशमबाबा दर्ग्याची जागा अतिक्रमणमुक्त करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 
s

धाराशिव- शहरातील नेहरू चौक येथील रेशमबाबा दर्ग्याची जागा अतिक्रमणमुक्त करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील अतिक्रमणामुळे दर्ग्याचे पावित्र्य धोक्यात आले असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती मनसेने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (दि.२७) जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नेहरू चौक येथील रेशमबाबा दर्ग्यासाठी अंबुरे कुटुंबियांनी त्यांच्या मालकीची जागा वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित केलेली आहे. सदर जागेवर २०१७ पासून कांहीजणांनी वक्फ बोर्डाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले आहे. सदर जागा बनावट कागदपत्रे तयार करून विक्री अथवा भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकार केले जात आहेत. अतिक्रमणामुळे दर्ग्याचे पावित्र्य भंग पावत असून विटंबना होत आहे. सदरील दर्ग्याच्या जागेवरील अतिक्रमण हटवून दर्गा अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, अन्यथा १ मे रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. 

निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, शहराध्यक्ष नवनाथ चव्हाण, मिलिंद चांडगे, विक्रम गपाट, सुधीर शिंगाडे, रणजित पापडे, सुधीर अंबुरे, नितेश वैकुंठे, बालाजी पवार, अक्षय कदम, विश्वनाथ तोडकरी, अमित सुरवसे आदींची स्वाक्षरी आहे.
 

From around the web