कोरोना पार्श्वभुमीवर वडगाव (सि) येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव रद्द

मंदिर संस्थान, ग्रामपंचायत, उत्सव समितीचा निर्णय
 
कोरोना पार्श्वभुमीवर वडगाव (सि) येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव रद्द

उस्मानाबाद  - तालुक्यातील वडगाव (सि) येथील सिध्देश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त होणारी यात्रा व इतर कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

उस्मानाबाद  शहरापासून तुळजापूर रस्त्यावर अवघ्या आठ किमी अंतरावर असणाऱया वडगाव येथे सिध्देश्वराचे प्राचीन व जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यातील चारही सोमवार तसेच महाशिवरात्री दिवशी दर्शन व अभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर श्रावन महिन्यातील चारही सोमवारी होणारी यात्रा व धार्मिक कार्यक्रम मंदिर संस्थानच्या वतीने रद्द करण्यात आले होते. आताही कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाशिवरात्री निमित्त या मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्याचा निर्णय सिध्देश्वर देवस्थान समितीच्या पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या आज वडगाव (सि) येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

या यात्रेच्या पार्श्वभुमीवर गर्दी होणाऱया सर्व कार्यक्रमांना फाटा देवून केवळ धार्मिक कार्यक्रम तेही कोरोना महामारीचे प्रतिबंधक उपाय पाळून करण्यात यावे असे आदेश जिल्हा प्रशासनाने मंदिर संस्थानला दिले असल्याची माहिती संस्थानच्या पदाधिकाऱयांनी दिली. त्यामुळे महाशिवरात्री निमित्त होणारी श्री. पालखीची गावातून होणारी सवाद्य मिरवणूक, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवसापासून श्रीला करण्यात येणारे अभिषेक, त्याच बरोबर यात्रे निमित्त आयोजित करण्यात येणारे करमनुकीचे कार्यक्रम, कुस्त्याचा फड आदी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. 

महाशिवरात्री दिवशी फक्त मंदिर संस्थानच्या वतीने श्री ला अभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तरी वडगाव व परिसरातील भाविकांनी याची नोंद घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

From around the web