कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 
कोळी बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

 उस्मानाबाद  -  कोळी समाजास महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० वर्षा पूर्वीच्या पुराव्याची अट न लावता सरसकट जातीचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी आदिवासी विकास संघ असोसिएशन महाराष्ट्र राज्य उस्मानाबाद‌ जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि. १६ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर तालुक्यातील नंदगाव व केशेगाव ही दोन गावे १९४८ च्या हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात दि.२२ मे १९४८ रोजी रझाकार यांनी केलेल्या हल्ल्यात ही दोन्ही गावे संपूर्णपणे लुटून बेचिराख करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या गावातील व्यक्तींची घरे व ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय जळाल्यामुळे त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. 

याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाने दि.१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना शपथ पत्र दिलेले आहे. तसेच याबाबत स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश महाराष्ट्र मराठवाडा या ग्रंथात देखील पुरावे उपलब्ध असल्याचे त्या शपथपत्रात नमूद केले आहे. तर उस्मानाबाद गॅझेटमध्ये पान नंबर १९४ वर देखील महादेव कोळी हे बालाघाट मध्ये राहतात असा उल्लेख आहे शासनाच्या परिपत्रकानुसार पन्नास वर्षांपूर्वीचे पुरावे न मागता महादेव कोळी या जमातीचे दाखले निर्गमित करावेत असे आदेश ३१ मे २००० व १६ मे २००४ रोजीचे आहेत. 

त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार कोणतेही पुरावे न मागता कोळी बांधवास महादेव कोळी जातीचे दाखले देण्यात यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष रविकिरण  घंटे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत घंटे, जिल्हा सचिव पंडित घंटे, कार्याध्यक्ष गंगाधर कोळी, गौरीशंकर कोळी, नागेंद्र जमादार, विजयकुमार घंटे, सारंग कोळी, सतिश कोळी, काशिनाथ कोळी, शंकर घंटे, रविराज कोळी, भालचंद्र कोळी, अमर कोळी, रतिक कोळी, शाम कोळी, रामदास खोत, गोकुळ कोळी, कार्तिक कोळी, खुशी कोळी, खंडू कोळी, दत्ता कोळी, युवराज कोळी, अनिल कोळी, धोंडू कोळी, रतिकांत कोळी, महेश कोळी व विष्णू कोळी आदी उपस्थित होते.


याबाबत दि.१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना निर्णय घेण्यास विनंती केली होती. जर त्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही तर दि. १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.

From around the web