उस्मानाबादेत दोन कोटी खर्चूनही डेपोतील कचरा हलेना

 
xs

उस्मानाबाद  -  जनतेच्या पैशावर ‘डल्ला’ मारण्याचं काम नगर पालिका सत्ताधाऱ्यांकडून सुरु असून बोगस कामे दाखवून करोडो रुपयांचा अपहार केला जात असल्याची तक्रार उपनगराध्यक्ष  अभय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 शहरातील सर्वे नंबर ३४८ मधील कचरा डेपोतील कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यासाठी सेव एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिनांक २५ /०७/ २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. या कामासाठी रुपये २ कोटी २० लक्ष किमतीची निविदा अंतिम करण्यात आली होती, व सहा महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे नमूद केले होते. कार्यारंभ आदेश देऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला, संबंधित कंत्राटदाराला यातील जवळपास रुपये २ कोटी अदा देखील करण्यात आले, मात्र कचऱ्याची परिस्थिती आजही 'जैसे थे' च आहे.  

d

 या कामात कंत्राटदाराने बोगस काम दाखवून सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने पैशाचा मोठा अपहार केला आहे. बायोमाइनिंग न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे, तर आगीमुळे धुराचे प्रचंड लोट येत असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. कराराप्रमाणे सहा महिन्यात सदरील काम पूर्ण करणे आवश्यक होते, मात्र आजवर काम झालेले दिसून येत नाही. कागदोपत्री मात्र बोगस काम दाखवून बिले उचलण्यात आली आहेत. कचरा डेपो मध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे डेपो बाहेर दूरवर कचरा टाकला जात आहे, याचा शहरवासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून वहिवाट करत असलेल्या शेतकऱ्यांची देखील यामुळे गैरसोय होत आहे.

दि. २५ नोव्हेंबर रोजी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. मात्र त्यांना झालेले काम सांगता आले नाही किंवा दाखवता आले नाही. प्रक्रिया केलेला उपयुक्त घन कचरा किती व त्याचा वापर कोठे करण्यात आला याची समाधानकारक माहिती उपलब्ध नाही. नगर पालिका जनतेची कामे करण्यासाठी आहे कि, जनतेचा पैसा हडपण्यासाठी हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.

 त्यामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. जिल्हाधिकारी यांनी या कामास प्रत्यक्ष भेट देवून सखोल चौकशीचे आदेश द्यावेत व जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दोषीं विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उपनगराध्यक्ष अभय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

From around the web