उस्मानाबादेत 'कोवॅक्सिन' पहिला डोस घेतलेले अनेक ज्येष्ठ नागरीक  दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत 

'कोवॅक्सिन' पहिला डोस घेतलेल्या ज्येष्ठांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडले 
 
उस्मानाबादेत 'कोवॅक्सिन' पहिला डोस घेतलेले अनेक ज्येष्ठ नागरीक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात भारत बायोटेकची 'कोवॅक्सिन'चा  पहिला डोस  घेतलेले अनेक नागरिक दुसऱ्या डोस पासून वंचीत असताना, मागील काही दिवसात लसच उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरीक  हवालदिल झाले आहेत. 


महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन लसी दिल्या जातात, पैकी कोवीशील्ड ही बहुतांश लोकांना दिली गेलेली आहे तसेच 'कोवॅक्सिन' चा पहिला डोस उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक  ज्येष्ठ व्यक्तींना तसेच प्रशासनात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता, त्याला आज जवळपास एक महिना ते दीड महिना कालावधी होत आलेला आहे.

मागील 28 तारखे पासून जिल्ह्यामध्ये 'कोवॅक्सिन' ही लस उपलब्धच नाही. प्रशासनाने किमान दुसरा डोस ज्यांचा राहिला आहे त्यांच्या पुरती का होईना कोवॅक्सीन ही लस  तात्काळ दिली पाहिजे.अनेकांनी सिव्हील हॉस्पिटल, जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लशीच्या उपलब्धते विषयी अनिश्चितता दर्शवली आहे.

कोव्हॅॅक्सिनचे महिनाभरात केवळ २४०० डोस उपलब्ध झाले आहेत. शिवाय दुसरा लॉट कधी येणार, याबद्दल अनिश्चितता आहे, त्यामुळे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. दरम्यान, निर्धारित वेळेत दुसरा डोस न घेतल्यास पहिल्या डोसची परिणामकारकता कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शासनाकडून कोराेना प्रतिबंधक लसीकरणाचा गाजावाजा सुरू आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. असे असले तरी प्रत्यक्षात लसींचा पुरवठाच नसल्याने जिल्ह्यात सगळ्याच लसीकरण केंद्रावर आता रांगा लागत आहेत. शिवाय साठा संपल्यानंतर नागरिकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. गंभीर बाब म्हणजे केंद्र शासनाचे लसी वाटपाबाबतचे नियोजनच नसल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. हा दुसरा डोस कधी मिळेल, याची शाश्वतीही नाही. कारण या लसीचा महिन्यापासून जिल्ह्याला साठाच आलेला नाही. 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख, ६३ हजार ६१३ कोेरोना प्रतिबंधक लस आल्या असून, त्यापैकी १ लाख, ३८ हजार ३१ जणांनी पहिला डोस तर २५ हजार ५८२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. केंद्र सरकारने आधी आरोग्य कर्मचारी,त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, सहव्याधी असलेल्या व सरसगट ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरणाची मुभा दिली. त्यानंतर १ मेपासून राज्य सरकारांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लसीकरण करावे, असे सूचविले. मात्र, त्यासाठी लसींचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. 

जिल्ह्याला पुरवठा करण्यात आलेल्या लसींमध्ये कधी कोविशिल्ड तर कधी कोवॅक्सिनचा समावेश आहे. वास्तविक पाहता आरोग्य प्रशासनाने जसा पुरवठा होईल, त्या पध्दतीने तातडीने लसीकरण केल्यामुळे सध्या कोणतीही लस शिल्लक नाही.आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार पहिला डोस घेतलेल्याच लसीचाच दुसरा डोस घ्यावा. यादरम्यानच्या काळात कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्या जिल्ह्यातील १४ हजार नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळतच नाही. कारण ही लसच महिनाभरापासून आलेली नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. महिनाभरात केंद्र सरकारकडून कोविशिल्ड लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली. मात्र कोवॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी आता कोवॅक्सिनच लस हवी आहे. मात्र ती मिळत नाही. त्यामुळे दुसरा डोस कधी मिळतो, याबद्दल नागरिकांमध्ये प्रतिक्षा आहे.

एकीकडे शासन लस घेण्याविषयी जागरूकता करत आहे व दुसरीकडे हजारो लोकांना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जात नाही तसेच पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसरा डोस ठराविक मुदतीत घेणे गरजेचे आहे असे वैद्यकीय निर्देश आहेत असे असताना सुद्धा प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलेला आहे . 

नागरिकांमध्ये संभ्रम व गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ,  'कोवॅक्सिन'  लस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी मागणी केली आहे.

कोविशिल्ड लसीचा पुरवठा अधिक
जिल्ह्याला आतापर्यंत करण्यात आलेल्या पुरवठ्यानुसार केंद्र सरकारकडून कोविशिल्डची १ लाख २३ हजार ७८० तर कोवॅक्सिनची ३४ हजार ३० लस आली आहे. कोविशिल्ड लसींचाच पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता केंद्र सरकारची कोवॅक्सिन लस उपलब्ध झाल्यास पहिला डोस दिलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले.

From around the web