धाराशिव पोलीस मुख्यालयासमोर बेकायदा बांधकाम : जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध मुख्याधिकाऱ्यांची भूमिका 

पाटील दाम्पत्यास विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पाठीशी घातले 
 
s

धाराशिव -  पोलीस मुख्यालयासमोरील सर्व्हे नंबर १४५/ ५ मध्ये प्रसाद रंगनाथ पाटील आणि पूजा प्रसाद पाटील यांनी आरक्षित केलेल्या खुल्या जागेत व रेखांकनातील अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण करून भूमिगत खोदकाम करून व खुल्या जागेत बोअरवेल पडून बांधकाम केले आहे.पाटील दाम्पत्यास तत्कालीन मुख्याधिकारी  हरीकल्याण येलगट्टे यांनी बेकायशीर बांधकाम परवाना दिला होता तर विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी हे बांधकाम पाडण्याऐवजीअळी मिळी गुप चिळी भूमिका घेतली आहे. 

या बेकायदा बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी कलम ५१ नुसार नोटीस देण्याचे बजावले असताना देखील मुख्याधिकारी वसुधा फड  यांनी प्रसाद रंगनाथ पाटील आणि पूजा प्रसाद पाटील  यांना कलम ५३ आणि ५४ ची नोटीस देऊन पाटील दांपत्यास पाठीशी घातले .  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्या  भूमिकेत बदल येत असून, हे गंभीर असल्याचे पत्र आ. सुरेश धस यांनी दिले आहे. आणि याप्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

काय आहे प्रकरण ? 

पोलीस मुख्यालयासमोरील छत्रपती हौसिंग सोसायटी ( बँक ऑफ महाराष्ट्र , आनंदनगर ) येथील सर्व्हे नंबर १४५/ ५ मध्ये प्रसाद रंगनाथ पाटील आणि पूजा प्रसाद पाटील यांनी आरक्षित केलेल्या खुल्या जागेत व रेखांकनातील अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण करून भूमिगत खोदकाम करून व खुल्या जागेत बोअरवेल पडून बांधकाम केले आहे.

याप्रकरणी माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी यापूर्वी तक्रार केली असता, चौकशीमध्ये तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनीच पाटील यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून बांधकाम परवाना दिल्याचे आणि प्रकरण अंगलट येताच, मूळ संचिका गायब केल्याचे दिसून आले. याप्रकरणी निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री भादंवि ४२०,४६५,४६८ नुसार गुन्हा दाखल आहे.


याप्रकरणी आ, सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पाटील दांपत्यास कलम ५१ ऐवजी ५३ ची नोटीस दिली . या नोटीस प्रकरणी प्रसाद रंगनाथ पाटील आणि पूजा प्रसाद पाटील यांनी कोर्टात धाव घेतली असता, कोर्टातून या नोटिशीला स्टे मिळाला आणि त्यांनी आपले बांधकाम सुरु ठेवले. पण नंतर कोर्टानेच स्टे उठवून बांधकाम बेकायदेशीर ठरवले आणि नगर पालिकेला नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र मुख्याधिकारी वसुधा फड ठोस कारवाई करायला तयार नाहीत. फड यांनी आपली जबाबदारी सहाय्यक नगर रचनाकार मनोज कलुरे यांच्यावर ढकलली पण कलुरे दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत.

त्यानंतर माजी नगरसेवक उदय निंबाळकर यांनी पुन्हा यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे तक्रार अर्ज करून, पोलीस बंदोबस्तात बांधकाम पाडण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांचे जसे हात ओले झाले होते तसेच नूतन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी देखील वाहत्या पाण्यात हात धुवून घेतल्याची चर्चा आहे.

From around the web