धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कचरा दिसल्यास नगर परिषदेच्या घंटागाड्या जाळणार !

शिवप्रेमींचा नप प्रशासनाला अखेरचा इशारा
 
d

धाराशिव- अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कायमस्वरुपी स्वच्छता ठेवावी यासाठी वारंवार पाठपुरावा करुन देखील नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे युुवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, युवक नेते रणवीर इंगळे यांच्यासह शिवप्रेमींनी शनिवारी (दि.24) स्वखर्चाने चौकात स्वच्छता मोहीम राबविली. संपूर्ण कचरा उचलून टँकरद्वारे पाणी मारून स्वच्छता करण्यात आली. तसेच चौकाची स्वच्छता करुन रस्ता दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात आले. आता चौकाची कायमस्वरुपी स्वच्छता न ठेवल्यास घंटागाड्या जाळण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील कचर्‍याच्या समस्येबाबत नगर परिषद प्रशासनाला यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊन इशारा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील कचरा अनेक दिवसांपासून उचलला नसल्याने नगर परिषदेसमोर कचरा टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने संतप्त शिवप्रेमींनी नगर परिषद कार्यालयासमोर कचरा टाकून 19 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले होते. यानंतरही नगर परिषदेला जाग आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, युवक नेते रणवीर इंगळे, सुधीर पवार,पंकज भोसले,अजिंक्य हिबारे, क्रांतिसिंह काकडे, दिपक जाधव यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.

sd


शिवप्रेमींनी शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वतः स्वच्छता मोहीम राबविली. टँकरद्वारे पाण्याची फवारणी करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यापुढे या परिसरात कचरा दिसून आल्यास नगर परिषदेच्या घंटागाड्या जाळून टाकण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

स्वखर्चाने रस्ता दुभाजकाला रंगरंगोटी करुन सुशोभिकरण
छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील रस्ता दुभाजकाच्या दुतर्फा कचरा टाकला जात असल्याने शहरातील मुख्य चौकाला अवकळा आली होती. नगर परिषद प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शिवप्रेमींनी स्वतः पुढाकार घेऊन शनिवारी चौकातील कचरा उचलून स्वच्छता केली. त्यानंतर रस्ता दुभाजकाची रंगरंगोटी करुन त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे स्लोगन लिहून यापुढे नागरिकांनी येथे कचरा टाकू नये असे आवाहन शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आले आहे.

From around the web