उस्मानाबादेत मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड

पोलिसांकडून अंमलबाजवणी सुरु 
 
उस्मानाबादेत मास्क न वापरल्यास पाचशे रुपये दंड

उस्मानाबाद  -  जिल्ह्यात विना मास्क प्रवास करणाऱ्या व्यक्तीवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनासह महसूल विभागाला विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करून त्यापोटी पाचशे रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. तर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, लग्न सोहळे यासाठीदेखील किमान व्यक्तींची उपस्थितीची मर्यादा यासह विविध अटी व नियम लागू केले आहेत.

 दि.२० फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी विना मास्क वाहनावर फिरणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यावेळी अनेक प्रवासी टू व्हीलर त्याबरोबरच चारचाकी वाहनांमध्ये विना मास्क फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. 


यावेळी वीस रुपयाचा मास्क वापरला असता तर बरे झाले असते. आता विनाकारण पाचशे रुपयांचा दंड फाडायची वेळ आली असे म्हणून स्वतःलाच दोषी समजत यापुढे काहीही सोबत नसले तरी चालेल. परंतू तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडायलाच नको अशी प्रतिक्रिया प्रवासी भगवान सूर्यवंशी यांनी  दिली.

From around the web