बंद पाकीट दिले तरीही बिल काढले नाही... 

धाराशिव झेडपीच्या बड्या अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावली 
 
zp obd

धाराशिव - बंद पाकीट दिले तरीही बिल काढले नाही त्यामुळे चिडलेल्या  एका कंत्राटदाराने झेडपीच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. हा अधिकारी नेमका कोण आहे आणि कंत्राटदार कोण आहे, याची चवीने चर्चा सुरु आहे. 

धाराशिव जिल्हा परिषदेच्या  बांधकाम विभागात एका कंत्राटदाराचे बिल अडकले आहे. हे बिल काढण्यासाठी संबंधित कंत्राटदार अनेक चकरा मारूनही त्याच्या  कामात त्रुटी काढून बिलच काढले जात नव्हते, शेवटी त्याने  एका बड्या अधिकाऱ्याच्या कलेक्शन करणाऱ्या वडिलांना भेटून बिल काढण्यासाठी ठरविक रक्कम दिली. त्यानंतर मार्च एन्डचा वायदा करण्यात आला. एप्रिल सुरु झाले तरीही त्याचे बिल काढण्यात आले नाही, त्यामुळे चिडलेल्या कंत्राटदाराने थेट झेडपी गाठून, त्या बड्या अधिकार्या बरोबर हुज्जत घातली आणि संतापाच्या भरात श्रीमुखात एकच लगावली. 

हा प्रकार सुट्टीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी घडला. महावीर जयंतीनिमित्त सुट्टी असताना, कलेक्शनसाठी साहेब ऑफिसमध्ये आले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना, व्हरांड्यात हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली नाही, त्याची  उलट- सुलट चर्चा सुरु आहे. 

सीसीटीव्ही बंद 

संतापाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेमधील सर्व सीसीटीव्ही बंद आहेत, या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी  सीसीटीव्ही  फुटेजची मागणी केली असता, सीसीटीव्ही बंद असल्याचे कारण  देण्यात आले. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सीसीटीव्ही बंद ठेवता येत नाही. तरीही सीसीटीव्ही बंद असल्यामुळे झेडपीमध्ये कलेक्शन किती जोरदार सुरु आहे, याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

From around the web