वैतागलेल्या नागरिकांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात केले चिखल फेक आंदोलन

यापुढे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात चिखल फेक करणार - साळुंके
 
s

धाराशिव  - शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामास दिरंगाई होत आहे. त्यामुळे रस्ते उकडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी थांबल्याने रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरलेला आहे. या चिखलामुळे नागरिकांना ये-जा करणे फार जिकरीचे झाले असून वाहने घसरुन पडत आहेत. त्यामुळे जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर परिसरात दुर्गंधी पसरल्याने डुकरांसह इतर जनावरांचा वावर वाढल्याने नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील सोयीस्करपणे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी शिवसेना (ठाकरे) शहर उपप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील चिखल नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात फेकून चिखल फेक आंदोलन दि.१० जुलै रोजी केले.

धाराशिव शहरात भूमिगत गटारीची कामे सुरु आहेत. यामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडले असून काळी माती वर आली आहे. तर पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. या चिखलाचा प्रचंड त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. त्याबरोबरच लहान मुले व दुचाकीस्वार घसरुन पडत असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे या रस्त्यावर असलेले खड्डे बुजवून पाण्याचा निचरा करण्यात यावा अशी वारंवार मागणी करण्यात आली.

 मात्र या मागणीकडे नगर प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील  नारायण कॉलनी, गालीब नगर, शिरीन कॉलनी, निजामोद्दिन कॉलनी, रझा कॉलनी, सुलतानपुरा, शाहूनगर, संभाजीनगर, वृंदावन कॉलनी या भागातील नागरिकांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात चिखल फेक आंदोलन केले. दरम्यान या भागात मुरूम टाकून दबाईचे काम नगर परिषदेने गुत्तेदारास दिले होते. परंतू राजकीय हस्तक्षेपाने प्रेरित होऊन येथील माजी नगरसेवकाने ते काम अडवणूक केल्यामुळे मुरूम टाकण्याचे काम बंद झाले आहे. ते तात्काळ चालू करून रोलरने रस्त्याची दबाई करुन नागरिकांना चिखलातून जाण्याची नामुष्की बंद करावी. अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनात चिखलफेक आंदोलन करण्यात येईल असा इशारा साळुंके यांनी दिला आहे. 

या आंदोलनामध्ये इस्माईल पटेल, सुलतान पठाण, सईद शेख, मैनुद्दीन शेख, जैद शेख, आसेफ पठाण, रोहन गव्हाणे, कबीर अहमद, आय.एल. कबीर, इस्माईल पठाण, आयुब खान पठाण, खालीद शेख, अब्दुल शेख, अजित बाकले, फरहान शेख, लैला शेख, इम्तियाज शेख, अल्ताफ शेख आदींसह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

From around the web