भुयारी गटारीच्या कामामुळे वाहनाचे व नागरिकांचे नुकसान
धाराशिव- धाराशिव शहरांतर्गत सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे वाहनांचे व नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर करारातील अटी व शर्तीचा भंग करुन संपत्तीचे नुकसानीस जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बिभीषण साळुंके यांनी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव येथील बाळासाहेब ठाकरेनगर येथे साळुंके यांच्या प्लॉटसमोर भुयारी गटार योजनेतून चेंबर घेतले आहे. चेंबर करण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम भरून ओबडधोबड काम केले. सदर चेंबरच्या दोन्ही बाजूने साधारणतः दीड फुटाचे खडे पडल्यामुळे चेंबर वरच राहिले. याबाबत संबंधित कंपनीचे काम करणारे अभियंता यांना 31 मे रोजी माहिती देऊन चेंबरच्या बाजूचे खड्डे बुजविण्याबाबत व्हाटसअॅपवर फोटो पाठवून कळविले होते. त्यानंतर साळुंके हे वैयक्तिक कामासाठी बाहेरगावी गेले. त्यानंतरही साळुंके यांनी पाठपुरावा करून खड्डे बुजविले का, असे फोनवरून विचारले असता खड्डे बुजविले असल्याचा निरोप दिला.
दरम्यान खड्डे बुजविलेले नसल्यामुळे 5 जून रोजी साळुंके यांची इनोव्हा कार सदरलील खड्डयात जाऊन चेंबरवर जोरात आदळल्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. याचीही माहिती व्हाटसअॅपवर फोटो आणि व्हीडीओ पाठवून संबंधित अभियंत्यास कळविली. परंतु कोणतीही दखल घेतली नाही. कराराच्या अटी व शर्तीनुसार नागरिकांचे जीवित अथवा आर्थिक संपत्तीचे नुकसान झाल्यास कंपनीने द्यावयाचे आहे. परंतु पाच दिवस झाले तरी वाहनाचे झालेले नुकसान भरून न दिल्यामुळे मला मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे. म्हणून अटी व शर्तीचे पालन न करणार्या कंपनीची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात यावा, असे साळुंके यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.