उस्मानाबादेत कोरोनामुळे शिवजयंती उत्सव समितीचे कार्यक्रम स्थगित 

 
उस्मानाबादेत कोरोनामुळे शिवजयंती उत्सव समितीचे कार्यक्रम स्थगित

उस्मानाबाद ‌- येथील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी दि.१९ फेब्रुवारी पर्यंतचे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले आहेत. मात्र कुराणाची वाढती संख्या व राज्यासह सर्वत्र निर्माण होणारी भयावह परिस्थिती लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने गर्दी करण्याबरोबरच कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम करू नयेत असे परिपत्रक काढल्यामुळे दि. २२, २३ व २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी परवानगी दिली नसल्यामुळे हे कार्यक्रम जनतेच्या हितासाठी तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.२० फेब्रुवारी रोजी दिली. 

येथील छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्टेज व सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणीच पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मार्गदर्शक प्रकाश जगताप, समितीचे कोषाध्यक्ष युवराज राजेनिंबाळकर, कार्याध्यक्ष राम मुंडे, सचिव श्याम नवले, समन्वयक मदन कुलकर्णी, संघटक विशाल पाटील, सदस्य रोहिणी कुंभार, गौस तांबोळी, विशाल थोरात, सौरभ देशमुख, संतोष मुळे, अॅड. अमोल वरुडकर, संजय गजधने, प्रसाद मुंडे, रुद्र भुतेकर आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना मोदानी  म्हणाले की, समितीच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यापैकी बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांचा रोजगाराच्या संधी आणि आव्हान, आरोग्य तपासणी शिबिर, छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महाभिषेक, शिवमुर्ती पूजन, पारंपारिक मिरवणूक, रांगोळी स्पर्धा, सायकल फेरी आदी कार्यक्रम व्यवस्थित घेतले गेले. कुराणाची वाढती रुग्ण संख्या चिंताजनक असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मास चा वापर केल्याशिवाय कोणीही बाहेर फिरू नये यासह विविध नियम व अटी लागू केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कार्यक्रमाचे सर्व नियोजन केले असताना देखील दि.२१ फेब्रुवारी रोजी ‌आयोजित करण्यात आलेला चला हवा येऊ द्या फेम कलाकारांचा कॉमेडी शो व ऑर्केस्ट्रा, दि.२२,२३ व २४ फेब्रुवारी रोजी शंभूराजे महानाट्य हे कार्यक्रम नाईलाजास्तव व तात्पुरते स्थगित करण्यात आले असून कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मोदानी यांनी दिली.

From around the web