कोरोनावरील लस उस्मानाबादेत पोहोचली ... 

 
कोरोनावरील लस उस्मानाबादेत पोहोचली ...

उस्मानाबाद - तब्बल १० महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या कोराेना आजाराला प्रतिबंध घालू पाहणारी लस अखेर बुधवारी (दि.१३) रात्री ८.२५ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत पोहोचली. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना शनिवारपासून(दि.१६) लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात ८ हजार ७०० कर्मचारी असून, त्यासाठी १० हजार ५० लस उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, लस घेऊन आलेल्या वाहनाचे जिल्हा परिषदेच्या आवारात बुधवारी सायंकाळी स्वागत करण्यात आले. या लसीमुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तसेच आशेचा किरण निर्माण झाला आहे.

जिल्ह्यासाठी कोविड लस बुधवारी रात्री ८.२५ वाजता जिल्हा परिषदेत दाखल झाली असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, डॉ. कुलदिप मिटकरी, लसीकरण विभागातील औषध निर्माण अधिकारी डी. सी. धोतरे, शित साकळी तंत्रज्ञ व्ही. के. शेळगावकर, आरोग्य कर्मचारी शरद मुंडे आदी कर्मचाऱ्यांनी लसी घेऊन आलेल्या वाहनाचे स्वागत केले. उपलब्ध लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ १६ जानेवारी २०२१ रोजी केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी कोविड लस दिली जाणार आहे.

 जिल्हा रुग्णालयात उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, उमरगा उप जिल्हा रुग्णालयात लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी पोर्टलवर ८ हजार ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी १० हजार ५० डोसेस जिल्हास्तरावर प्राप्त झालेले आहेत. प्रत्येक सत्राच्या ठिकाणी प्रति दिन १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोसे दिले जाणार आहेत. साठवण क्षमता २४५० लीटर किंवा ५ लाख डोसेस इतकी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, डॉ. कुलदीप मिटकरी, डी. सी. धोतरे, व्ही. के. शेळगावकर, आरोग्य कर्मचारी शरद मुंडे यांनी लसीची पाहणी केली.

From around the web