कोरोना : उस्मानाबादेत परदेशातून आलेल्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले

 
कोरोना : उस्मानाबादेत परदेशातून आलेल्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉजिटीव्ह रुग्ण सापडला नाही, मात्र  परदेशातून आलेल्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. पुणे - मुंबई येथून आलेल्या लोकांकडे लोक संशयाने पाहात आहेत. इतकेच नव्हे तर त्याना बळजबरीने दवाखान्यात तपासणीसाठी पाठवत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात परदेशातून आलेल्या ६ नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य विभागाने भेटी दिल्या असून असून  दुबई व अमेरिका येथून आलेल्या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्हा बाहेरून आलेल्या ५९ नागरिकांना खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या नागरिकात कोरोना आजाराची लक्षणे नाहीत त्यामुळे त्यांना घरी आरोग्य पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

यात उस्मानाबाद तालुक्यातील ८ , तुळजापूरसह लोहारा आणि वाशी प्रत्येकी ४ , उमरगा २१ , कळंब ५, भूम १० आणि परंडा तालुक्यातील ९ नागरिकांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांसह पुणे मुंबई या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन व आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतलेल्या किंवा घरी निगराणीखाली असलेल्या व्यक्तीबाबत संशयीत रुग्ण असा शब्दप्रयोग न वापरण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी हे तोंडी आदेश बैठकीत दिले आहेत. संशयीत रुग्ण ऐवजी संभाव्य हा शब्द वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. संशयीत रुग्ण शब्द वापरल्याने रुग्णासह नागरिकांच्या मनात भीतीची भावना निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रशासकीय पातळीसह सोशल मीडियावर संशयित हा शब्द सर्रास वापरला जातो त्यामुळे रुग्णांना अनेक वेळा मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.

ग्रामस्थांनी संयम बाळगावा – डॉ.वडगावे

पुणे, मुंबईसह शहरी भागातुन अनेक नागरिक ग्रामीण भागात आपल्या मुळ गावी येत आहेत. मात्र, काही गावात गावकरी अशा नागरिकांकडे संशयाने पहात असून त्यांना कोरोना झालेला आहे असे समजुन थेट रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करीत आहेत, हे चुकीचे आहे.

नागरिकांनी घाबरुन न जाता स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा उप जिल्हा रुग्णालयात तपासणी करावी, अशी विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी केली आहे. तसेच काही गावात बाहेरुन येणार्‍या नागरिकांना कोरोनाचे रुग्ण समजुन वाळीत टाकण्याचा व गावात प्रवेश न देण्याचा प्रकार घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची असून, नागरिकांनी असे प्रकार टाळावेत, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


From around the web