जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी मास्क,सॅनिटायझर व साबण असे किट देण्याचा उपक्रम

 
१ लाख मास्कचे उत्पादन चालू :  ५ लाखांचा निधी उपलब्ध - राणाजगजीतसिंह पाटील

जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी मास्क,सॅनिटायझर व साबण असे किट देण्याचा उपक्रम

उस्मानाबाद  - कोरोना विषाणूचा वाढत चाललेल्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर  गोरगरीब नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून दोन मास्क, सॅनिटायझर व साबण असे किट व सोबत एक माहितीपत्रक देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुरुवातीला ५ लाख रुपये उपलब्ध केले असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली. 

कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू असून यात सर्वात महत्वाचा भाग हा हातांची स्वच्छता व बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे हा आहे. मात्र समाजात असा एक वर्ग आहे ज्याला यासाठी आवश्यक असणाऱ्या मास्क, सॅनिटायझर व साबण या वस्तू विकत घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे समाजातील अशा घटकांचा विचार करून आपण अनेकांशी विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात  उस्मानाबाद, तुळजापूर व कळंब तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रोटरी क्लबची या कामी मदत घेतली जाणार असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे स्वच्छता किट देण्यात येणार आहे. याकामी सुरुवातीला ५ लाखांचा निधी उपलब्ध केला असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले आहे. 

या उपक्रमाला मोठ्या संख्येने मास्क लागणार असल्याने उस्मानाबाद येथे मास्कचे उत्पादन चालू केले असून जिल्ह्यातील वस्त्र निर्मिती करणाऱ्या संस्थांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे व याबाबत चर्चा देखील झाली आहे. सॅनिटायझरची निर्मिती स्थानिक पातळीवर होण्यासाठी जिल्ह्यातील कांही साखर कारखाना प्रशासन व संबंधित खात्याचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोललो असून लवकरच सॅनिटायझरचे उत्पादन देखील स्थानिक पातळीवर सुरू होईल अशी माहिती आ.पाटील यांनी दिली.

एका कुटुंबाला एक किट देण्यात येणार असून त्यासाठी दोन मास्क,सॅनिटायझर व साबण सह कोरोना विषाणू चा प्रसार रोखण्यासाठी व त्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणारे एक माहितीपत्रक देखील देण्यात येणार आहे.

या अनुषंगाने आ.तानाजीराव सावंत व आ. ज्ञानराज चौगुले यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींशी चर्चा केली असता ते देखील सकारात्मक आहेत. आ.सावंत यांनी मास्क व सॅनिटायझर निर्मिती साठी आपण तयार असल्याचे सांगत तातडीने त्याची सुरुवात करून उपलब्ध करू असे म्हटले तर आ.चौगुले यांनी देखील यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.जिल्हा परिषद उस्मानाबाद व जिल्ह्यातील  नगरपरिषदा यांचीही याकामी मदत घेतली जाणार आहे.
ज्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी रोटरी क्लब उस्मानाबाद चे अध्यक्ष श्री.सुधाकर भोसले,तुळजापूर चे अध्यक्ष श्री सचिन शिंदे व नगरसेवक पंडित जगदाळे, कळंब चे अध्यक्ष श्री.हर्षद अंबुरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.

From around the web