२९ ऑगस्टच्या घंटानाद आंदोलनास भाजपाचा पाठींबा

 


२९ ऑगस्टच्या घंटानाद आंदोलनास भाजपाचा पाठींबा

उस्मानाबाद -   कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ‘पुनःश्र्च हरिओम’ नावाखाली सर्वकाही चालू केले मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली आहे.

          राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाने देखील आता या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

          यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर स्थित महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरासह राज्यातील इतर मंदिरे उघडण्याची मागणी भाजपा आमदार सुजीतसिंह ठाकुर आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली होती.केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत.

                   सर्व नियम मान्य करुन देखील देवस्थाने उघडण्याची मागणी महाविकासआघाडी सरकार मान्य करत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. आध्यात्मिक समन्वय आघाडीने या आंदोलनाची हाक दिली आहे.  भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून भाजपच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते बंधू-भगिनी पदाधिकार्‍यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

          उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व मंदिरांसमोर हे आंदोलन होणार आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींसह या आंदोलनास फेस मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

From around the web