उस्मानाबाद शहराच्या विकासासाठी २०८ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता

भुयारी गटारीचे काम संपल्यानंतर सर्वे कामे लागणार मार्गी -  नगराध्यक्ष राजेनिंबाळकर
 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी २०८ कोटी रुपये विकास निधी मंजूर करण्यात यश आले आहे. या निधीच्या माध्यमातून संपूर्ण शहरातील भुयारी गटारी करण्यासह मुख्य व अंतर्गत असलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दि.१३ डिसेंबर २०१७ ते दि.११ मे २०२१ पर्यंत विविध पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. भुयारी गटाराचे काम आगामी दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तर या निधीच्या माध्यमातून शहराच्या आगामी २० वर्षातील विस्तारित भागाचा देखील या विकास करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मंजूर करण्यात आलेल्या निधी कामे होईपर्यंत मुदतवाढ देण्यास शासनाने मान्यता देखील दिलेली आहे. त्यामुळे परिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला असून या निधीचा उपयोग पुढील विकास कामे करण्यासाठी निश्चितपणे उपयोग होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. ४ सप्टेंबर रोजी दिली.

s

विकास कामासंदर्भात नगर परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सोमनाथ गुरव, प्रदीप घोणे उपस्थित होते. पुढे बोलताना नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले की, भुयारी गटार योजना राबविण्यासाठी शहरातील नागरिकास प्रती माणसी १३५ लिटर पाणी पोहोचले पाहिजे. यासाठी अटल अमृत योजनेमधून पंपिंग मशीन दुरुस्त करून पाणी उच्च दाबाने उचलण्यासाठी दि. १३ डिसेंबर २०१७  ला भुयारी गटार योजनेचा ठराव नगर परिषदेने घेतला. 

तो प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेसाठी पाठविला. तर दि.२९ जून २०१९ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नगर प्रशासनाचे संचालक यांच्याकडे दि.२७ ऑगस्ट २०२० रोजी तो परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला. त्याची नगर प्रशासनाने छाननी केल्यानंतर स्टेट लेवलसाठी दि.२५ नोव्हेंबर २०२० रोजी या प्रस्तावास तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. तसेच नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामास दोन टप्प्यात मान्यता देऊन दि. ११ मे २०२१ ला या कामासाठी १६८ कोटी ६१ लाख ७० हजार ९७५ रुपयांच्या निधीस अंतिम मान्यता  दिली आहे. त्यामुळे शहरातील भुयार गटारीची कामे दोन टप्प्यात करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ते कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती मकरंद राजेनिंबाळकर सांगितली. दरम्यान, शहरातील अनेक विकास कामे प्रलंबित होती. ती कामे करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करून पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे त्या कामास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.प्रा. तानाजीराव सावंत, आ. कैलास पाटील व आ. ज्ञानराज चौगुले यांनी वेळोवेळी मोलाची मदत केली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

भुयारी गटार केल्यानंतर शहरातील इतर कामे करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस तांत्रिक मान्यता घेतली आहे. तसेच माझा  कार्यकाळ संपण्यापूर्वी २५ ते ३० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गोदावरी खोरे व कृष्णा खोऱ्यामध्ये शहराची विभागणी

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालय या राष्ट्रीय महामार्गपासून पूर्वेकडील भाग गोदावरी खोऱ्यात तर पश्चिमेकडील भाग कृष्णा खोऱ्यात येत आहे.गोदावरी खोऱ्यातील व कृष्णा खोऱ्यातील सर्व सांडपाणी हे भुयारी गटाराद्वारे भोगावती नदीमध्ये आणून सोडले जाणार आहे.

सांडपाण्याचे शुद्धीकरण करून होणार पुनर्वापर

शहरातील सांडपाणी भोगावती नदीत आणल्यानंतर त्या पाण्याचे वैराग रोडवरील भोगावती पुलाच्या जवळ स्थिरीकरण करून त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. शुद्धीकरण केलेले पाणी खालील भागात म्हणजे राघूचीवाडी या धरणात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी २२ एमएलडी म्हणजे २ कोटी २० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचा प्लान्ट उभारण्यात येणार असून सीवेज ट्रीटमेंट प्लान्ट (एसटीपी) मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे पाणी शुद्ध केल्यानंतर ते राघूची वाडी धरणात सोडून त्याचा शेती व पिण्यासाठी वापर करण्यात येणार आहे.

कचरा डेपोचा रस्ता होणार १८ मीटरचा

शहरातील कचरा ज्या ठिकाणी गोळा केला जातो. त्या कचरा डेपोकडे जाण्यासाठी १० मीटरचा रस्ता होता. मात्र या रस्त्याच्या बाजूला शेती असलेल्या शेतकऱ्यांनी स्वखुषीने टिडीआर न घेता स्वखुशीने ४ फूट रस्ता करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी ३ कोटी १७ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी नगर परिषदेकडे पैसे नसतात. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपणास मोठे रस्ते हवे असतील तर कचरा डेपो रस्त्याच्या बाजूस असलेल्या शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे टीडीआर घेतला नाही. ज्याप्रमाणे नागरिकांनीदेखील रस्ते मोठे करण्यासाठी स्वखुशीने जागा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन राजेनिंबाळकर यांनी यावेळी केले.

३०० किलोमीटर भुयार गटाराचा मार्ग

शहरात संपूर्णपणे भुयार गटार करण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या घरातील शौचालय व इतर सर्व प्रकारचे सांडपाणी हे या भुयारी गटारीमध्ये सोडण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहरातून ३०० किलोमीटर आकाराची भुयारी गटार तयार करण्यात येणार आहे. तर प्रत्येक ३३ मीटर अंतरावर एक चेंबर बसविण्यात येणार आहे. तसेच दारासमोरील असलेल्या गटारीचा उपयोग हा केवळ पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीच होणार आहे. त्यामुळे यापुढे शौचालयासाठी बांधण्यात येणाऱ्या शेपटी त्यांची आवश्यकता भासणार नसल्याने यापुढे कोणीही सेफ्टी टँक बांधण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी नमूद केले.

धारासूर मर्दिनी देवस्थान परिसर विकसित करणे, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला अली दर्गा येथे भक्तनिवास बांधण्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर शहराच्या इतर विविध भागातील सिमेंट कॉंक्रीट रस्ते व नाली बांधकामासाठी देखील तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 

From around the web