शिवसैनिक बाळासाहेब देशमुख यांचे अपघाती निधन
उस्मानाबाद - शहरातील एमआयडीसी भागात झालेल्या भीषण अपघातात शिवसैनिक बाळासाहेब देशमुख हे जागीच ठार झाले तर शिवसेनेचे शहराध्यक्ष पप्पू उर्फ संजय मुंडे व सहकारी सूरज शिंदे हे जखमी झाले.जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे तिघे शिवसैनिक गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास रेनो डस्टर कारने माजलगावकडे जात असताना, एमआयडीसी मध्ये असलेल्या उड्डाण पुलाखालील रस्त्याने बीड रस्त्याकडे न वळता चुकून एमआयडीसी रस्त्याला वळले. पुढे रस्ता संपल्याने कार आरटीओ ऑफिससमोर गाडी खड्ड्यात पडून हा अपघात झाला आहे.
सूरज शिंदे हे कार गाडी चालवत होते, त्यांच्या बाजूला पप्पू उर्फ संजय मुंडे बसले होते. पाठीमागे मध्यभागी बाळासाहेब देशमुख बसले होते. अपघातात मध्यभागी बसलेले बाळासाहेब देशमुख यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर सूरज शिंदे आणि पप्पू उर्फ संजय मुंडे किरकोळ जखमी झाले.
अपघातात मयत पावलेले बाळासाहेब देशमुख हे मूळ गौरचे असून, ते उस्मानाबाद शहरातील तांबरी भागात राहत होते. भाजप नेते सुधीर पाटील यांचे ते मावसभाऊ होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.