भोगावती नदीपात्राच्या स्वच्छतेसह दोन्ही बाजूला भिंत बांधून सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करा

दीड हजार नागरिकांचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना निवेदन
 
d

उस्मानाबाद- उस्मानाबाद शहरातून वाहणार्‍या भोगावती नदीची स्वच्छता करुन नदीपात्राच्या दोन्ही बाजूला भिंत बांधून सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. नदीपात्र कायमस्वरुपी स्वच्छ असावे याकरिता उपाययोजना करुन नागरिकांची दुर्गंधी, साथीच्या रोगांपासून मुक्तता करावी अशी मागणी उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. तब्बल दीड हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी व जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक भारतीय नागरिकाला चांगल्या पर्यावरणात जगण्याचा व स्वच्छ वातावरणात राहण्याचा आणि चांगल्या आरोग्याचा मुलभूत अधिकार आहे. उस्मानाबाद शहरातून वाहणारी भोगावती नदी ही नगर परिषद उस्मानाबाद यांनी नव्याने घोषीत केलेल्या प्रभाग क्र. 1, 4, 5, 9, 13, 16, 15 या प्रभागातून वाहते. सदर नदी प्रभाग क्र. 9 मधून प्रभाग क्र. 13 मध्ये वाहत येत असताना अत्यंत घाण व दुर्गंधीसह वाहत येते. प्रभाग क्र. 13 मधून दुर्गंधीयुक्त घाणीने भरलेली रोगराई व डास पसरवणारी व मोकाट डुक्कर आणि कुत्र्यांचा सुळसुळाट असलेली घाण पाण्याच्या नाल्यासारखी वाहते. पुढे आणखी घाण होऊन प्रभाग क्र. 16 व प्रभाग क्र. 15 मध्ये वाहत जाते. सदर नदीची स्थिती घाण पाण्याच्या नालीसारखी झाली असून सदर नदीत गावातली घाण येऊन मिसळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. दुर्गंधीमुळे वायु प्रदूषण होत आहे. त्यामुळे भोगावती नदीचे घाण वाहणार्‍या नालीमध्ये रुपांतर होऊ लागले आहे. सदर घाण पाण्यामुळे व दुर्गंधीमुळे प्रभाग क्र. 13, 16 आणि 15 मध्ये रोगराई व दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 13, 16, 17 व 15 मधील व सभोतालचे लोकांना जलप्रदुषण व वायु प्रदुषणाचा त्रास होत आहे. यामुळे भोगावती नदीच्या सभोताली राहणार्‍या लोकांमध्ये भोगावती नदी वरील डासांमुळे डेंग्यू मलेरिया इत्यादी रोग होत आहेत. प्रदूषणामुळे लोकांना श्वासोश्वासाचे विकार होत असून प्रभाग क्र. 13 मधील व सभोतालच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रभाग क्र. 13 मध्ये भोगावती नदीच्या किणारी राजे बागेतील महादेव मंदिर, ताजमहल टॉकीज मागील लोकवस्ती, काळा मारुती मागील परिसराताल लोकवस्ती, सांजावेस गल्ली येथील लोकवस्ती, कोटगल्ली येथील लोकवस्ती चुनाभट्टीची लोकवस्ती, धाराशिव प्रशालेजवळील लोकवस्ती असून धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर या दोन शाळा नदीच्या अगदी बाजूला आहेत. तसेच शेंद्रया मारुती मंदिर, लहान मुलांचे खेळण्याचे जिजामाता उद्यान, ग्रामदैवत श्री कपालेश्वर महादेव मंदिर, इंगळे गल्लीतील लोकवस्ती, नेहरु चौक परिसर, जुने श्रीराम मंदिर, हनुमान मंदिर, नेहरु चौकातील मशीद इत्यादीसोबत दाट लोकवस्ती असून सदर प्रभागातील भोगावती नदीभोवती असून बाजारपेठ व भाजी मंडई आहे. नदीच्या घाणीमुळे जलप्रदुषणामुळे व वायु प्रदुषणामुळे या भागातील लोकांना त्रास होत आहे. व लोकाचे आरोग्य बिघडून रोगराई पसरत आहे. यामुळे उस्मानाबादच्या लोकांच्या सुविधा व मुलभूत हक्कांचे आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे.

अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 13, 16 व 15 मधील वाहणार्‍या भोगवती नदीच्या स्वच्छतेबाबत नगर परिषद उस्मानाबाद यांनी कोणतीही योग्य ती तरतूद व कार्यवाही केले नसल्याचे दिसून येते. नगर परिषद लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. तरी उस्मानाबाद शहरातून वाहणार्‍या भोगावती नदीची विशेषतः प्रभाग क्र. 13 मधून वाहणार्‍या भोगावती नदीची पूर्णपणे स्वच्छता तात्काळ करण्यात यावी, तसेच सदर भोगावती नदीच्या दोन्ही बाजूस कायमस्वरुपी टिकाऊ संरक्षीत कॅनॉल पध्दतीच्या स्लोप भिंती बांधण्यात याव्यात. नदीमध्ये वाहत येणार्‍या किंवा शहरातून नदीत सोडल्या जाणार्‍या घाणीची पर्यायी सुविधा करावी व दोन्ही संरक्षण भिंतीच्या बाहेरच्या बाजूला घाण वाहून नेणार्‍या बंदीस्त नाल्या बांधाव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधि मानवी हक्क व आरटीआय विभागाचे उपाधक्ष अ‍ॅड. विश्वजीत शिंदे, काँग्रेसचे माजी तुळजापूर तालुकाध्यक्ष सिद्रामप्पा मुळे, जिल्हा कॉग्रेसचे सचिव अ‍ॅड. जावेद काझी, काँग्रेस मानवाधिकार विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोढे, जिल्हा सल्लागार अशोक बनसोडे, जिल्हा सचिव रिजवान सय्यद, जिल्हा सचिव अ‍ॅड. दिलिप कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अभिमान पेठे, जिल्हा काँग्रेस विधि विभागाचे सरचिटणीस अ‍ॅड. रत्नदिप सोनवणे, पवनराजे पांचाळ, डॉ. लतीफ सय्यद, शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांच्यासह प्रभाग क्रमांक 13 मधील दीड हजार नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
 

From around the web