उस्मानाबाद नगर पालिकेच्या बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर
उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर पालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांच्याकडेच प्रशासक पदाची सूत्रे हाती आली आहेत. येळगट्टे यांनी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच थकबाकी वसुली करण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. ज्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे, त्यांची नावे आणि थकबाकीची शहरात चौकाचौकात होर्डींज लावून जाहीर केली आहेत, त्यात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव दोन नंबरवर आहे. मात्र त्यावर चिकटपट्टी लावण्यात आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथे 'अ' दर्जाची नगर पालिका आहे, लोकसंख्या १ लाख २० हजार असून एकूण ३९ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष असे ४० पदाधिकारी होते, आता निवडणूक झाल्यास २ नगरसेवक वाढणार असून, एकूण ४१ नगरसेवक निवडून जाणार आहेत. दरम्यान पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच प्रशासकांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
येळगट्टे यांनी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेताच, थकबाकीदाराकडून वसुली करण्यासाठी चक्क चौकाचौकात होर्डिंग लावले आहेत. त्यात शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव नंबर दोनवर आहे. खासदार ओमराजे यांच्या कुटुंबाकडे मागील साडेसात लाख आणि चालू साडेतीन लाख थकबाकी आहे. पैकी त्यांनी साडेसात लाख भरल्याने त्यावर चिकटपट्टी लावण्यात आली आहे.
तसेच मावळते नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे बंधू चित्रसेन राजेनिंबाळकर यांच्याकडे ४ लाख ९३ हजार थकबाकी आहे. तसेच जनता बँकेचे माजी चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांच्या पत्नी कांता मोदाणी यांच्याकडे ६ लाख ८५ हजार , डॉ. दिग्गज दाबके यांच्याकडे ८ लाख ४३ हजार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे यांच्या पत्नी सूचिता गोरे यांच्या नावावर ६ लाख ९९ हजार, पुष्पक मंगल कार्यालयाचे मालक अनिल नाईकवाडी यांच्याकडे ५ लाख ७५ हजार. आशिष मोदाणी यांच्याकडे ४ लाख ४६ हजार, सतीश दंडनाईक यांच्याकडे १६ लाख , दिलीप देशमुख यांच्याकडे १८ लाख थकबाकी थकलेली आहे.
गोरगरीब लोकांकडून सक्तीने वसुली करणारी नगरपालिका बड्या लोकांकडून थकबाकी वसूल करण्यात कमी पडत असून, प्रशासक येताच पालिकेला जागा आली आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंधूंच्या नावावर चिकटपट्टी का लावण्यात आली, याचे उत्तर मुख्याधिकारी हरीकल्याण येळगट्टे यांनी समाधानकारक न दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
हे आहेत बडे थकबाकीदार