मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालातील कारभाराची चौकशी करा
उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या 2016 ते डिसेंबर 2021 या कालावधीतील तसेच 2012 ते 2015 या प्रभारी अध्यक्षपदाच्या कालावधतील कारभाराची चौकशी करुन स्पेशल ऑडिट करण्याची मागणी काँगे्रस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मकरंद राजेनिंबाळकर हे 2016 ते डिसेंबर 2021 या कालावधीत नगराध्यक्षपदी होते. तसेच यापूर्वी सन 2012 ते 205 या कालावधीत देखील त्यांनी नगराध्यक्ष पदाचा कारभार पाहिला आहे. सदरील कालावधीत नगर पालिकेत प्रचंड गैरव्यवहार व अनियमितता झालेली आहे. सन 2018-19 मध्ये बायोमायनिंगची निविदा मॅनेज करुन चुकीच्या पद्धतीने सुरुवातीस दीड कोटीचे देयक काम न करता उचलले. मोठी रक्कम उचलल्यानंतरही कचरा डेपोवरील ढिगारे अद्याप तसेच आहेत. मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दलित वस्ती, जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) व इतर योजनांच्या निधीतून मर्जीतील गुत्तेदारांमार्फत कामे करुन मोठ्या प्रमाणात रक्कम हडप केली. म्हणून प्रत्यक्ष सभागूृहात झालेले ठराव परस्पर बदलून स्वतःचा आर्थिक फायदा करुन घेतला.
नगराध्यक्षपदाच्या कार्यकालात त्यांनी दमदाटी करुन चुकीचे प्रशासकीय कामकाज करुन घेतले. जुलै 2021 च्या एकाच सर्वसाधारण सभेत चारशे पेक्षा जास्त कामे मंजूर करुन घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकालातील कारभाराचे स्पेशल ऑडिट करुन शहरातील जनतेवर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सिद्धार्थ बनसोडे, अजहर पठाण, मुहीब शेख, प्रवीण केसकर यांची स्वाक्षरी आहे.