धाराशिव शहरातील पाणी, वीज पुरवठ्यात व्यत्यय

ठाकरे सेनेचा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
 
s

धाराशिव -महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जाणूनबुजून 15 व्या वित्त आयोगाचा हप्ता न दिल्यामुळे धाराशिव शहरातील पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडित होत असल्याने विकासकामांना खीळ बसत असून येत्या दहा दिवसात शहराचा पाणीपुरवठा व वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने देण्यात आला आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे - पाटील मा.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर  यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळा कडून जिल्हधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, धाराशिव नगर परिषदेमार्फत शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पाणी पुरवठ्याचे वीज देयक नगर परिषद 15 व्या वित्त आयोगातून अदा करते. परंतु शिंदे-फडणवीस सरकारकडून जाणूनबुजून नगर पालिकेला निधी न दिल्यामुळे मुबलक पाणीसाठा असताना गेल्या चार महिन्यापासून नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. 

मार्च 2022 अखेर एक रुपयाची थकबाकी नसलेली धाराशिव ही महाराष्ट्रातील एकमेव नगर परिषद असताना शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात निधी रोखल्यामुळे सुमारे पाच-सहा कोटी रुपयाची  थकबाकी वाढली आहे. त्यामुळे महावितरण नगर परिषदेचा वीज पुरवठा वारंवार खंडित करत असल्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे सरकार असल्याचे दिसून येत आहे.

येत्या दहा दिवसात शहरातील नपची वीज जोडणी करुन शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर नपचे मा.गटनेते सोमनाथ गुरव, शहरप्रमुख संजय मुंडे, मा.नगरसेवक राजाभाऊ पवार, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे, बंडू आदरकर, अभिजित कदम, नीलेश साळुंके, नाना घाडगे, अजय नाईकवाडी, मनोज केजकर, अमित उंबरे, यशवंत शहापालक, महेश लिमये, मन्सूर काझी, मुस्तकीम कादरी आदींची स्वाक्षरी आहे.
 

From around the web