आंदोलनात सहभागी नगर परिषद कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा

मुख्याधिकारी येलगट्टे यांनी 105 जणांना पाठविली कारणे दाखवा नोटीस

 
d

उस्मानाबाद - विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन कार्यालयात गैरहजर राहिलेल्या 105 नगर परिषद कर्मचार्‍यांना उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे कामचुकारांसह गैरवर्तन करणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामध्ये उस्मानाबाद नगर परिषदेतील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह प्रशासकीय विभागातील कामकाजात अडथळा निर्माण झाला. याबाबत मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. येलगट्टे यांनी आंदोलनात सहभागी होऊन कामाला दांडी मारलेल्या सुमारे 105 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये दि. 2/5/2022 या दिवशी सहभागी होऊन कार्यालयात गैरहजर राहिला. 

नगर पालिकेची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याचे आपणास ज्ञात असताना देखील विनापरवाना गैरहजर राहिलात. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यास अडथळा निर्माण झाला. सदरची वर्तणूक ही महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल, वर्तणूक) नियम 1979 मधील तरतुदीनुसार उल्लंघन करणारी आहे. या बाबीस आपणास जबाबदार धरुन आपणाविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यानंतर तात्काळ माझ्यासमक्ष स्वतः उपस्थित राहून लेखी सादर करावा अन्यथा याबाबत आपले काहीही म्हणणे नाही असे गृहित धरुन आपणाविरुद्ध नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी श्री. येलगट्टे यांनी म्हटले आहे.

नियमानुसार नोटीस

नगर परिषद संचालनालयाच्या संचालकांनी नगर परिषद कर्मचार्‍यांच्या बेकायदेशीर आंदोलनाच्या अनुषंगाने पत्र पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 105 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. काही कर्मचारी किरकोळ रजेवर होते. दोघे-तिघेजण संपात सहभागी नव्हते. कारणे दाखवा नोटिस बजावलेल्या कर्मचार्‍यांचा खुलासा समाधानकारक न आल्यास त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे.

- हरिकल्याण येलगट्टे
मुख्याधिकारी तथा प्रशासक

From around the web