उस्मानाबाद शहरातील तीन उद्यानांसाठी सात कोटींचा निधी मंजूर

आमदार कैलास पाटील यांची माहिती
 
dada1

उस्मानाबाद - वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उस्मानाबाद शहरातील दोन उद्यानाच्या विकासासाठी आणि एका नव्याने करण्यात येणाऱ्या उद्यानासाठी सात कोटींचा निधी नगरविकास विभागाने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

 शिवसेनेचे पालकमंत्री शंकरराव गडाख, आमदार प्रा. तानाजीराव सावत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने निधी मंजूर करण्यात आला आहे. 

या निधीतून शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, छत्रपती संभाजी महाराज उद्यान या दोन उद्यानाचा विकास करण्यात येणार असून, नगर परिषद शाळा क्रमांक 18 येथे नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

राज्यातील नगर परिषदाना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत उस्मानाबाद नगरपालिकेला सात कोटींचा निधी नगर विकास विभागाने मंजूर केला आहे. या मंजूर निधीतून शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी तीन कोटी रुपये, नगरपालिका शाळा क्रमांक 11 जवळील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या विकासासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नगरपालिका शाळा क्रमांक 18 जवळ नवीन उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद शहरामध्ये सध्या एकही उद्यान सुस्थितीत नाही. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ट नागरिकांना विरंगुळासाठी एकही ठिकाण नाही. उस्मानाबाद शहरात लहान मुलांपासून ज्येष्ट नागरिकांना विरंगुळा म्हणून उद्यानांची गरज होती. ही गरज ओळखून शहरात असलेली दोन उद्याने विकसित करण्यासाठी आणि नगरपालिका शाळा क्रमांक १८ जवळ नव्याने उद्यान विकसित करण्यात येणार आहे. शहरातील राष्ट्रमाता जिजामाता उद्यान हे सर्वात जुने उद्यान आहे. या उद्यानाची दुरावस्था झाल्याने त्याचा कायापालट करण्यासाठी नगरपालिकेने प्रयत्न सुरु केले होते. या उद्यानाचा विकास करावा, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात येत होता. 

समतानगरमधील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचीही दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या उद्यानाचा विकास करण्यासाठी नगरपालिकेने नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. पालकमंत्री गडाख, आमदार प्रा. सावंत, खासदार राजेनिंबाळकर, आमदार घाडगे -पाटील, नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी उद्यानांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी प्रयत्न केले. त्यांची ही मागणी लक्षात घेता नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उस्मानाबाद शहरातील तिन्ही उद्यानांसाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

या निधीतून या तिन्ही उद्यानांचा कायापालट करण्यात येणार आहे.  निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार कैलास पाटील यांनी आभार मानले आहेत.

From around the web