उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे पर्यंत बंद

 
उस्मानाबाद व तुळजापूर नगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी आस्थापना व दुकाने 31 मे  पर्यंत बंद


        उस्मानाबाद,- महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 31 मे 2020 पर्यंत वाढविला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणू   (COVID-19) चा रुग्ण आढळून आलेला असल्यामुळे आणि कोरोना विषाणू (COVID-19)  चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

          जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी (COVID-19)  होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर    नगर पालिका क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, अन्न, भाजीपाला, दूध आणि किराणा पुरविणाऱ्या आस्थापना (सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीतच सुरु राहतील). उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रातील पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील. तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24x7) चालू राहील. बी-बियाणे व खते या कृषी निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहतील. दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे, मीडिया, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर नगर पालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 31 मे 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

         या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद  व तहसीलदार उस्मानाबाद व तुळजापूर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उस्मानाबाद व तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उस्मानाबाद व तुळजापूर  शहरातील मंडळ अधिकारी, तलाठी, नगर परिषद कर्मचारी  इत्यादींची असेल.

            या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

          या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 20 मे 2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

From around the web