उस्मानाबादेत पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या समर्थनार्थ २३ संघटना रस्त्यावर

 
s

उस्मानाबाद  - शहरातील कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे पथक गेले असता त्या पथकावरच कसायांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करीत त्या पोलिसांच्या समर्थनार्थ २३ संघटना रस्त्यावर उतरून त्यांनी संबंधितावर कारवाई करण्याबरोबरच जिल्हाभरातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्यात यावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि.५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पोलिसांचे पथक शहरातील कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेली असता तेथील कसायांनी व इतरांनी पोलिसांवर सशस्त्र हल्ला चढवला. यामध्ये २ पोलिस कर्मचारी, १ पशु मानद कल्याण अधिकारी व अन्य १ असे चौघेजण गंभीर जखमी झाले. वास्तविकत: जनतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या व आपले कर्तव्य बजावत असलेल्या या कर्मचाऱ्यांवर हल्ला होणे ही बाबच मुळात खूप गंभीर आहे. 

मागील हल्ल्यात देखील पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. जनतेचे रक्षण करणाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत की काय ? अशी भावना जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे.  पोलिसांवरच जर असे प्राणघातक हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाच्या भरवशावर रहायचे ? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच  महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांवरील दबाव दूर करून त्यांना मुक्त कारवाईचे आदेश द्यावेत. 

 हे प्रकार असेच चालू राहिले तर उद्रेकाची भावना निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे पोलिसांवर हल्ले करणाऱ्या व सतत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या व सामाजिक तेढ निर्माण करून धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असलेल्यांवर वेळीच कारवाई नाही केली तर  खूप गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकतो. तसेच पोलिसांवर वारंवार खुनी व सशस्त्र हल्ले करणाऱ्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, गोरक्षकांवर मागील काही दिवसात आपल्या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी प्राणघातक हल्ले झाले आहेत, त्यामुळे गोरक्षकांना संरक्षण देण्यात यावे. गोवंश रक्षा कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद करण्यात यावेत, जिल्ह्याच्या प्राणी क्लेश समितीवर अध्यक्षपदी कुरेशी यांची नियुक्ती असल्याचे समजते. ती नियुक्ती रद्द करून जुनी प्राणी क्लेश समिती बरखास्त करून समिती नव्याने गठीत करण्यात यावी व त्या समितीत फक्त प्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्यांनाच प्राधान्य द्यावे. 

तसेच शहर पोलिस ठाण्याच्या जवळ सरकारी जागेवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम केले जात आहे. ते तात्काळ थांबवण्यात यावे. जिल्ह्यातील बोकाळलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अधिवक्ता परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदुराष्ट्र सेना, छावा संघटना, हिंदू जनजागृती समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हनुमान विचार मंच, ब्राम्हण महासंघ, सनातन संघटना, भाजप, शिवसेना, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, वडार समाज संघटना, वाल्मिकी संघटना, भवानी ग्रुप, छत्रपती यम उस्मानाबाद, साईराज तरुण गणेश मंडळ, जय बजरंग ग्रुप व कोळी राष्ट्रसंघ या संघटनांनी केली आहे.

From around the web