शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करा

आ.सतीश चव्हाण यांची केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे मागणी
 
s

औरंगाबाद- उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे 9 ते 13 टक्के याप्रमाणे आहेत. जे की सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

           यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.4) अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी आज भागवत कराड यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी भागवत कराड यांच्याशी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले. 

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत. पर्यायाने शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकामध्ये शैक्षणिक कर्ज मिळते. मात्र वेगवेगळ्या बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे 9 ते 13 टक्के याप्रमाणे आहेत. जे की सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी भागवत कराड यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागातील शेतकरी कटुंबातील अनेक होतकरू, हुशार विद्यार्थ्यांनी कर्ज काढून उच्च शिक्षण पूर्ण तर केले मात्र अपुर्‍या संधीमुळे त्यांना अद्यापही नोकरी मिळालेली नाही. त्यात कोविडमुळे सर्वच पालकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजदर फेडायचे कसे? असा प्रश्न अनेक विद्यार्थी व पालकांसमोर उभा राहीला असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी भागवत कराड यांना सांगितले.

 गृह कर्ज, वाहन कर्ज हे 5 टक्के व्याजदराप्रमाणे मिळते. त्याच प्रमाणे शैक्षणिक कर्ज देखील याच व्याजदराप्रमाणे मिळायला हवे. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले तरी केवळ शैक्षणिक शुल्क जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी केल्यास गरजू, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

     जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बॅकांना इष्टांक देण्यात यावे, पाच लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज घेणार्‍या विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करावा व याचा लाभ याआधी शैक्षणिक कर्ज घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात यावा अशा मागण्या देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी केल्या. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाईल असे भागवत कराड यांनी आश्वस्त केले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

From around the web