ऍट्रॉसिटी प्रकरणी लाखनगावच्या सरपंचास अटकपूर्व जामीन मंजूर

उस्मानाबाद - अपहरण, मारहाण आणि ऍट्रॉसिटी प्रकरणी लाखनगावच्या सरपंचासह पाच जणांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजूर केला आहे.
वाशी तालुक्यातील लाखनगावचे सरपंच अशोक उर्फ बंटी लाखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्याना जवळा शिवारातील हॉटेल रानवारा मध्ये जेवण दिले होते. त्याचे काही बिल येणे बाकी होते, यावरून अशोक उर्फ बंटी लाखे आणि हॉटेल चालक हनुमंत परमेश्वर नाळपे यांच्यात वाद सुरु होता. यावरून लाखे आणि इतर चार जणांनी हनुमंत परमेश्वर नाळपे आणि त्यांचा कामगार अनिल कांबळे यांचे दि. १५/२/२०२० रोजी अपहरण करून शेंडी फाटा येथे मोटारसायकलवरून नेले आणि तेथे लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खिशातील दहा हजार रुपये काढून घेतले अश्या आशयाची फिर्याद हनुमंत परमेश्वर नाळपे आणि त्यांचा कामगार अनिल कांबळे यांनी वाशी पोलीस स्टेशन मध्ये दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सरपंच अशोक उर्फ बंटी लाखे यांच्यासह पाच जणांनी भूम न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता, पण तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अशोक लाखे यांच्यासह पाच जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असता, त्यांना अंतरिम जामीन मिळाला होता. हा अंतरिम जामीन नुकताच कायम करण्यात आला आहे. आरोपी सरपंच अशोक उर्फ बंटी लाखे यांच्यासह पाच जणांची बाजू ऍड.सुशांत चौधरी यांनी मांडली .