मराठवाड्यातील रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लावा

आ.सतीश चव्हाण यांचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना साकडे
 
s

औरंगाबाद- मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न, मागण्या, सर्वेक्षण, प्रस्ताव, वर्षानुवर्षे कागदावरच आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील रखडलेले रेल्वे प्रकल्पाची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

           मराठवाड्यातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.4)  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राबवसाहेब दानवे यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले. मराठवाड्यात रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यातही बहुतांश एकेरी मार्गच. परिणामी रेल्वेगाड्यांची संख्याही कमी आहे. नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच मराठवाड्याची वर्षानुवर्षे निघून गेली आहेत. मराठवाड्यातील रेल्वेच्या मागण्यांना रेल्वे बोर्डाकडून एकतर केराची टोपली दाखविली जाते. अन्यथा तुटपुंज्या निधीवर बोळवण केली जाते. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेची अवस्था आजही ‘जैसे थे’च असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

 मराठवाड्यातील रेल्वेचे वर्षानुवर्षे रखडलेले मनमाड-परभणी दुहेरीकरण, परळी-बीड-नगर रेल्वे मार्ग, रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्ग, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-गेवराई जळगाव रेल्वे मार्ग, औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्ग, औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग, जालना-खामगाव रेल्वे मार्ग, लातूर रोड-अहमदपूर-लोहा-नांदेड रेल्वे मार्ग आदी प्रकल्प मार्गी लागले तर मराठवाड्याचा औद्योगिक, शैक्षणिक विकासाबरोबरच पर्यटन वाढीस चालना मिळण्यास मदत होईल असे आ.सतीश चव्हाण यांनी रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले. 

आपल्या रूपाने मराठवाड्याला रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाल्याने मराठवाड्यातील रखडलेले रेल्वे प्रकल्प नक्कीच मार्गी लागतील अशी आशा मराठवाड्यातील जनतेमधून व्यक्त होत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी रावसाहेब दानवे यांना सांगितले. तसेच मराठवाड्यातून मुंबई जाण्यासाठी नवीन रेल्वे गाड्या सुरू कराव्यात अशी देखील मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली.

           रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात आपण स्वत: लक्ष घातले असून मराठवाड्यातील रखडलेले रेल्वे प्रकल्प लवकरच मार्गी लावले जातील असे आश्वस्त केले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. 

.

From around the web