मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत

विद्यार्थ्यांना दिलासा : प्रवेशाच्या मुदतीतही वाढ 
 
मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सवलत

औरंगाबाद -  येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र औरंगाबाद केंद्रातंर्गत औरंगाबाद,बीड,जालना व उस्मानाबाद जिल्हयांचा समावेश होत असुन, चारही जिल्ह्यात विद्यापीठाच्या जवळपास 200 अभ्यास केंद्रावर सध्या विविध शिक्षणक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. विद्यापीठातर्फे 2020-2021 या शैक्षणिक वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश घेतांना प्रवेश शुल्क दोन टप्प्यात भरण्याची सुविधा मंगळवार दिनांक 03 नोव्हेंबर 2020 पासुन उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य भरात अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे हा निर्णय घेण्यात येऊन प्रवेशाच्या मुदतीतही वाढ करण्यात आल्याची माहिती कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांसाठी या वर्षीचे प्रवेश कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विलंबाने सुरु झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यातच गेल्या महिन्यात सर्वत्र अवकाळी पावसाने घातलेले थैमान, यामुळे अनेक विद्यार्थ्याना इच्छा असुनही विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेता आले नाहीत. अनेक भागात पावसा मुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस आणि कोरोना महामारी यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थंना दिलासा देण्याचा एक प्रयत्न आणि पुरेशा शुल्काअभावी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये किंवा  ते वंचित राहू नयेत, म्हणून आता 03 नोव्हेंबर 2020 पासुन प्रवेश घेणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्याना दोन टप्प्यात प्रवेश शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

विद्यार्थ्याना लगेचच संपुर्ण शुल्क ऑनलाईन भरण्याची गरज नाही. एकूण शुल्कापैकी पन्नास टक्के शुल्क भरून त्यांना हव्या असलेल्या शिक्षणक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. उरलेले पन्नास टक्के शुल्क दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठाने दिलेल्या मुदतीत भरता येईल. यासोबतच प्रवेश घेण्याची  मुदतही सध्या 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली असून, या सुविधेचा अवश्य लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांना प्रवेश घ्यावा असे अवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेश संबधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विभागीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे 

From around the web