केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जन आशीर्वाद यात्रेस पालघर येथून प्रारंभ

 
s

पालघर -  सेवा ही संघटन ही भाजपाची खरी कार्यप्रणाली आहे.  याच हेतूने जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सोमवारी केले. पालघर येथून जन आशीर्वाद यात्रेचा प्रारंभ करताना त्या बोलत होत्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. डॉ अशोक ऊईके, आ. मनीषा चौधरी व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील आदी या प्रसंगी उपस्थित होते.

          डॉ. पवार म्हणाल्या की, आदिवासी बांधव इंग्रजांना घाबरले नाहीत. कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची क्षमता आदिवासी बांधवांमध्ये आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ आदिवासी खासदारांना मंत्रीपद दिले आहे. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू व विकास कामांचा प्रवाहाच्या माध्यमातून जनतेची सेवा करू. यात्रा सुरु होण्यापूर्वी भारती पवार यांनी  भारतरत्न अटल बिहारी यांना स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहिली. हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून यात्रेस सुरुवात झाली. ही यात्रा पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील ५ लोकसभा मतदारसंघात ४३१ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. उज्वला योजनांच्या लाभार्थी महिलांतर्फे भारती पवार यांचे स्वागत करण्यात आले. 

          त्या पूर्वी त्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटरची विचारणा केली. व्हेंटिलेटर अन्यत्र वापरले गेल्याचे सांगितले गेल्यावर अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

          यात्रेचे मनोर येथील बस स्थानकावर येथे जंगी स्वागत झाले. यात्रेदरम्यान डॉ. भारती पवार व अन्य नेत्यांनी उपस्थितांपैकी अनेकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. चारोटी नाक्यावर जनधन योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी डॉ. भारती ताईंचा सत्कार केला. जनधन योजना, उज्वला गॅस योजना लाभार्थ्यांनी जागोजागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे  व भारतीताई पवार यांच्या स्वागताचे फलक हातात घेऊन जागोजागी उत्स्फूर्तपणे यात्रेचे स्वागत केले.

From around the web