दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडणार 

 
दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडणार

मुंबई - गेली सहा महिने कुलूपबंद असलेली राज्यातील मंदिरे  दिवाळी पाडव्यापासून उघडणार आहेत.सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.मात्र भाविकांना यावेळी कोरोनाच्या नियमांचं म्हणजेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगच पालन करावं लागणार आहे.

सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण  -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
 

राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. 

महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत असल्याचे सांगतानाच दरेकर म्हणाले की, हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार,जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. 

वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केली आहे.

मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय - चंद्रकांतदादा पाटील

शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च हरी ओम म्हणत राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू करून अनेक बाबींना परवानगी दिली तरी अनेक महिने मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली नव्हती. अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने मंदिरे उघडण्याची परवानगी मिळण्यासाठी पुनःपुन्हा आंदोलने करावी लागली. भारतीय जनता पार्टीने भाविकांच्या आंदोलनांना सक्रीय पाठिंबा दिला. पण सत्तेसाठी महाविकास आघाडी आंधळी झाली असल्याने ती मद्यालये उघडण्यास परवानगी देत असली तरी देवालये उघडण्यास परवानगी देत नव्हती. देवस्थाने बंद असल्याने त्यांच्या परिसरात भाविकांची सेवा करणाऱ्या व्यावसायिकांची रोजीरोटी बंद झाली होती. कोरोनाचे सर्व निर्बंध पाळण्याची तयारी भाविकांनी दाखवली तरीही हे सरकार कठोरपणे परवानगी नाकारत होते. भाविकांना देवापासून दूर ठेवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नावर अखेर श्रद्धेने मात केली आणि या सरकारला मंदिरे उघडण्यास परवानगी देण्याची सुबुद्धी सुचली. त्याचे आपण स्वागत करतो. सरकारने भाविकांची सत्वपरीक्षा पाहण्यापेक्षा यापूर्वीच मंदिरे उघडण्याची परवानगी दिली असती तर बरे झाले असते.

त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजूनही या साथीचा धोका संपलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी मंदिरांमध्ये दर्शन घेताना मास्क वापरणे, अंतर राखणे अशा कोरोनाविषयी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे अवश्य पालन करून काळजी घ्यावी.

From around the web