मंदिर विषयावर शुद्र राजकारण - शरद पवार 

निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही
 
मंदिर विषयावर शुद्र राजकारण - शरद पवार

मुंबई -  मंदिर उघडा या विषयावर जे काही राजकारण केलं गेलं त्यावर मी काही भाष्य केलं नाही. एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण ठिक आहे निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.


भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार सुरू आहे. त्यांना सर्वसामान्यांचा ज्यापध्दतीने पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा मिळाल्याच्यानंतर जे काही नैराश्य आले त्या नैराश्यातून हे सर्व होत आहे. आपल्याला सत्ता मिळणार नाही यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात असल्याचेही शरद पवार म्हणाले.

रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत काम करत आहेत. पण ठीक आहे मला त्यांचा हा गुण माहित नव्हता. साधारणतः खेड्यापाड्यात शेतकर्‍यांमध्ये काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहात होतो. पण उद्याचं चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहीत नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे तर तसं होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुडया ज्योतिषाचं काही चालत नाही असा चिमटा शरद पवार यांनी दानवेना काढला.

सत्ता गेल्यानंतर त्रास होतो मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी अशाप्रकारचे शब्द जनरली न वापरणारेही वापरायला लागतात त्यामुळे ते गांभीर्याने घेवू नये असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आघाडी सरकार बेईमान सरकार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता त्याला शरद पवार यांनी आपल्या पध्दतीने आज उत्तर दिले आहे.


त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठिक आहे त्याच्याकडे बारकाईने लोक लक्ष देतात. अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल असेही शरद पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर आपल्या विचारांशी जे लोक नाहीत त्यांच्याविरोधात वापरायची ही पध्दत याठिकाणी सुरू झालीय यापेक्षा काही वेगळं नाही अशा शब्दात शरद पवार यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर भाष्य केले आहे.

तर जरा गंभीरपणाने महाराष्ट्र नोंद घेतो अशांचे प्रश्न विचारा काही काय विचारता! अशा शब्दात शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उत्तर दिले.

From around the web