भाजपा - शिवसेनेतर्फे ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
 
s

नागपूर - देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे राज्यभरात ३० मार्च ते ६ एप्रिल याकाळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेद्वारे नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, नागपूर जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, नागपूर महानगर अध्यक्ष आ. प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

श्री . बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा प्रवास करेल. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी ६ एप्रिल रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः या यात्रेत सहभागी होणार आहोत.

महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी  काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला. सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती. उद्धव ठाकरेंकडे धाडस असेल तर त्यांनी काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून टाकावी असे आव्हान आपण त्यांना दिले होते. मात्र हे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

          या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे श्री . बावनकुळे यांनी सांगितले. यात्रेचे विभागवार प्रमुख असे -  मुंबईसाठी  आ. अमित साटम, ठाणे -कोकण - आ. निरंजन डावखरे, आ.नितेश राणे, पश्चिम महाराष्ट्र - प्रदेश महामंत्री  मुरलीधर  मोहोळ, विक्रम पावसकर, उत्तर महाराष्ट्र - आ. जयकुमार रावल,  प्रदेश महामंत्री विजय चौधरी, मराठवाडा - आ. संभाजी निलंगेकर, प्रदेश महामंत्री संजय केणेकर, पूर्व विदर्भ - आ. प्रवीण दटके, आ. विजय  रहांगडाले, पश्चिम विदर्भ - आ. संजय कुटे, प्रदेश महामंत्री आ. रणधीर सावरकर.

From around the web