नव्या संसद भवनाला विरोध करणारे संजय राऊत देशद्रोही

भाजपा आ. नितेश राणे यांचा घणाघात
 
s

मुंबई -    नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वादंग निर्माण करत  संविधानीक संस्था, पदांविषयी अविश्वास निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्याच्या शहरी नक्षलवाद्यांच्या कुटनीतीचा वापर करणारे खा. संजय राऊत देशद्रोह करत आहेत अशी घणाघाती टीका भाजपा आ. नितेश राणे यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी  आमदार राम सातपुते,मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

                   आ. राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगभरात गौरव होत आहे. मोदी आणि भारताचा सन्मान होत असल्याचे खा. राऊत यांना पाहवत नाही.म्हणून असुयेपोटी नव्या संसद भवनाची गरज नाही, राष्ट्रपतींचा अवमान केला जातो अशी फुटकळ चर्चा घडवली जाते. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असताना सर्वानुमते नव्या संसद भवन उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळची शिवसेना एनडीए चा घटक पक्ष होता. तो निर्णय खा. राऊत यांच्यासारख्याना  चुकीचा वाटू लागतो हे अनाकलनीय आहे असे आ. राणे म्हणाले. नव्या संसद भवनाच्या उभारणीवर टीका करणाऱ्या खा. राऊत यांनी  उद्धव ठाकरेंना नव्या मातोश्री बांधणीची काय गरज भासली असं विचारलं होत का, असा सवालही  आ. राणे यांनी केला.

                  जयंत पाटील व अजित पवार यांच्यात भांडण लावून राष्ट्रवादी फोडण्याचा खा. राऊत यांचा डाव असल्याचे आ. राणे म्हणाले.जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ सामना चा अग्रलेख लिहीला जातो मात्र अजित पवारांच्या समर्थनात साधा लेखही लिहीला जात नाही, उलट त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, असे आ. राणे यांनी नमूद केले.

                  जयंत पाटील यांच्या वर भाजपा प्रवेशासाठी दबाव टाकण्यासाठी ईडी कारवाई केली जाते अशी टीका करणाऱ्या खा. राऊत यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाई बद्दलही असेच बोलावे असे आव्हान आ. राणे यांनी दिले. दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या हस्तकांना साथ दिल्याबद्दल नवाब मलिक यांना अटक झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट रचणा-या दाऊदला मदत करणा-या मलिक यांची बाजू घेणाऱ्या खा. राऊत यांचा खरा चेहरा यातून दिसतो आहे, असेही आ. राणे म्हणाले.

From around the web