कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून पोलीस पत्नीची निर्घृण हत्या

 
कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून पोलीस पत्नीची निर्घृण हत्या


नागपूर : कोरोना व्हायरसमुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची घरात शिरून गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राज्यभरातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर तुरुंग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी काही उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तुरुंग प्रशासनाने कच्च्या कैद्यांना तात्पुर्ता जामीन देऊन त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याने ही हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.


नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढवे नगरात राहणाऱ्या 55 वर्षीय सुशीला मुळे यांची राहत्या घरीच निर्घृण हत्या झाली आहे. मृत सुशीला यांचे पती अशोक मुळे हे नागपूर पोलीस दलात कार्यरत असून त्यांची नेमणूक गुन्हे शाखेतच आहे. आज सकाळी अशोक मुळे हे ड्युटी वर गेले होते. तर सुशीला मुळे आणि त्यांचा तरुण मुलगा घरी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच तुरुंगातून पॅरोलवर सुटका झालेला नवीन गोटाफोडे हा मुळे यांच्या घरी आला. तो सुशीला यांच्या मुलाचा लहानपणीचा मित्र असल्याने भेट घ्यायचे आहे, असे बोलला. मात्र, सुशीला यांनी मुलगा झोपला आहे असे सांगून सध्या भेटता येणार नाही असे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी नवीन गोटागोडे नावाच्या आरोपीने घरात शिरून सुशीला यांची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी नवीन गोटाफोडे हा सराईत गुन्हेगार असून तो 28 मार्चपर्यंत तुरुंगात होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याची पॅरोलवर सुटका झाली होती.

नवीन गोटाफोडे तेव्हा तर निघून गेला. मात्र, काही वेळाने तो पुन्हा परतला. स्वयंपाक घरात शिरून धारधार शस्त्राने सुशीला यांच्या गळ्यावर वार केले. हल्ल्यानंतर आरोपीने तिथून पलायन केलं. त्याने ही हत्या का केली हे अजून समजले नसून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. 

From around the web