ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

 
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

मुंबई - अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे.हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (29 एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

"कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं," अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या.

कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते. परदेशी उपचार सुरू असताना त्यांनी अनेकदा मायदेशी येण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती. पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकण्याची त्यांची खूप इच्छा होती. मला पुन्हा काम मिळेल ना, अशी चिंता ते मुलांकडे व पत्नीकडे व्यक्त करायचे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट बिग बींनी केलं.

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.


From around the web