मकरजला गेलेल्या राज्यातील ६० जणांचे मोबाईल स्विच ऑफ

 
गृह विभागाची डोकेदुखी वाढली 

मकरजला गेलेल्या राज्यातील ६० जणांचे मोबाईल स्विच ऑफ


मुंबई- दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमाला हजेरी लावून महाराष्ट्रात परतलेल्या  ५० ते ६० जणांचे मोबाईल स्विच ऑफ लागत असल्याने राज्याच्या गुह विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

निजामुद्दीन दिल्ली येथील तबलिगी मरकजमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यातले ५० ते ६० जण बेपत्ता आहेत. त्यांना सूचित करण्यात येतं आहे की त्यांनी लवकरात लवकर जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि चाचणी करुन क्वारंटाइन व्हावे असे आवाहनही गृह मंत्रालयाने केले आहे. असं न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

मकरजला गेलेल्या लोकांमुळे मुंबई आणि राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढल्याचं चित्र समोर आले आहे. दिवसागणिक ही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका करोनाग्रस्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपाचर करत आहे. मरकज येथे गेलेल्या लोकांमुळे इतरांना करोनाची लागण होऊ नये या उद्देशानं पालिकेनं ट्विट करत दिल्लीला कार्यक्रमासाठी गेलेल्या लोकांबाबत माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. आता असंच आवाहन राज्याच्या गृहमंत्रालयानेही केलं आहे. तसंच हे आवाहन न ऐकल्यास कारवाईचेही आदेश दिले आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना बाधित रुग्णाचा आकडा एक हजार पार झालेला आहे. राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018  झाली आहे. यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3, बुलढाणा 2, ठाणे 2, नागपूर 3, सातारा 1, औरंगाबाद 3, रत्नागिरी 1, सांगली 01 असा तपशील आहे.

From around the web