तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती - शरद पवार

 
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती - शरद पवार


मुंबई - दिल्लीमधील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची अजिबात गरज नव्हती असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं योग्य पालन करा असं आवाहन केलं.


“या सगळ्या स्थितीत एकत्र राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कटुता, संशय वाढेल अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याची गरज आहे. मी टीव्हीवर जे काही पाहतो व्हॉट्सअपवर येणारे मेसेज चिंता निर्माण करणारे आहेत. काही मेसेजची तपासण केल्यानंतर लक्षात आलं की, पाच पैकी चार मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते,” असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

आणखी आठ दिवस सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. काळजी घेतली तर आपण निश्चितच कोरोनावर मात करु. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करत आहेत. सगळ्या जातीधर्मांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.

'एक दिवा ज्ञानाचा' लावून फुले जयंती आणि 'एक दिवा संविधानासाठी' लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.

येत्या काही दिवसात शब ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका असं आवाहन शरद पवार यांनी  केलं.  आहे. 

From around the web