महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची चिन्हे

 
महाराष्ट्रातील लॉकडाऊन  ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची चिन्हे


मुंबई - महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शवली आहे. लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची तयारी दाखवली. तसंच याबाबत केंद्र सरकारने यासाठी मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे.

देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 1000 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेत आहेत.मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधानांची बैठक खूप महत्वाची मानली जाते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, तेलंगानाचे सीएम केसीआर राव यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत. 

From around the web