भरमसाठ वीज बिलांची फेरतपासणी करा

 

किरीट सोमैय्याआ. डावखरे यांची वीज नियामक आयोगाकडे याचिका


भरमसाठ वीज बिलांची फेरतपासणी करा


लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आदी मागण्या करणारी याचिका भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी राज्य विद्युत नियामक आयोगापुढे दाखल केली आहे.

आपल्या याचिकेत डॉ. सोमैय्या यांनी लॉकडाऊन काळात अनेक व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकांना आलेल्या भरमसाठ वीज बिलांकडे आयोगाचे लक्ष वेधले आहे. अनेक ग्राहकांना सरासरी बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असताना शेकडो युनिटचा वापर केल्याबद्दल ग्राहकांना बिल पाठवण्यात आले आहे. घरगुती ग्राहकांनाही अशाच पद्धतीने चुकीची बिले पाठविण्यात आली आहेत. सामान्य माणसाला ही भरमसाठ वीज बिले भरणे शक्य नाही. वीज बिल भरले नाही म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकारही घडले आहेत.

डॉ. सोमैय्या यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील मागण्या केल्या आहेत. ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या अवाजवी वीज बिलांची फेरतपासणी करावी बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यास स्थगिती द्यावी कोरोना काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी तसेच ३०० युनिटपर्यंत सवलतीच्या दराने वीज द्यावी लॉकडाऊन काळात वीज मंडळाने केलेली दरवाढ रद्द करावी वीज बिल भरण्यासाठी ६ महिने मुदत द्यावी.
 या मागण्या मान्य करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि राज्य वीज वितरण मंडळाला आदेश द्यावेत अशी विनंती डॉ. सोमैय्या आणि आ. डावखरे यांनी वीज नियामक आयोगाला केली आहे.

From around the web