विरोधासाठी विरोध करून जनतेची कुचेष्टा करू नका...

 
भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रत्युत्तर

विरोधासाठी विरोध करून जनतेची कुचेष्टा करू नका...


कोरोनाच्या विरुद्धचे युद्ध हे वेगळे युद्ध असून त्यामध्ये प्रत्येक नागरिक सैनिक आहे. संयम राखून देशाचे रक्षण करणाऱ्या नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पकतेने आणि गांभीर्याने रविवारी रात्री नऊ वाजता पारंपरिक दिवे लावण्याचे आवाहन केले असताना त्याला इव्हेंट समजणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाच प्रसंगाचे गांभीर्य नाही असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी दिले.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिक्रियेचा समाचार चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला.

सामान्य लोकांचा निर्धार ही या लढाईतील सर्वात महत्त्वाची बाब आहे. थोरात यांना सामान्य लोकांबद्दल काही आपुलकी नसेल तर त्यांनी गप्प बसावे पण त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या उपक्रमाची कुचेष्टा करू नये व गंभीर संकटाच्या वेळी जनतेचे मनोबल खच्ची करू नये अशी सूचना  चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की जनतेने संयम पाळून सोशल डिस्टन्सिंग करणे हाच कोरोनाच्या साथीवरील प्रभावी उपाय सध्या आहे. संपूर्ण समाज संयमाने व एकजुटीने या अनोख्या संकटाचा सामना करत आहे. देशाचा प्रमुख या नात्याने सैनिकांचे म्हणजेच सामान्य नागरिकांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मा. पंतप्रधानांनी एक अत्यंत कल्पक आणि सर्वांना सहज करता येईल असा उपाय सांगितला. त्याचे स्वागत करून सामान्य लोकांना साथ देण्याच्या ऐवजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या उपक्रमाला इव्हेंट म्हणतात म्हणजे त्यांना या संकटाचे गांभीर्य नाही आणि त्याविरुद्ध लढणाऱ्या सामान्य लोकांची किंमत नाही हे स्पष्ट होते.

ते म्हणाले की कोरोनामुळे लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या गरीबांना चार घास मिळावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने तीन महिन्यांचे रेशनचे धान्य एकदम देण्यासाठी योजना जाहीर केली व त्यानुसार धान्य उपलब्ध केले. पण राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने गरीबांना मिळणारे मोफत धान्यही अटी घालून अडवून ठेवले आहे. विरोधासाठी विरोध करताना सर्वसामान्य जनतेला असे वेठीला धरणे योग्य नाही. पंतप्रधान म्हणून काय करावे याचे सल्ले देणाऱ्या थोरात यांनी आधी मोदीजींनी गरीबांसाठी पाठवलेले धान्य त्यांच्यापर्यंत पोहचेल याची सरकार म्हणून खबरदारी घ्यावी व नंतरच फुकटचे सल्ले द्यावेत.

कोरोनाचे संकट आल्यानंतर मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना केली म्हणूनच आज इतर मोठ्या देशांच्या तुलनेत भारतात ही साथ अजूनही कमी प्रमाणात आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लाखो कोटी रुपये उपलब्ध केले असून वैद्यकीय आघाडीसह सर्व आघाड्यांवर प्रभावी काम चालू आहे. जनतेच्या सहभागामुळे या कामात यश मिळत आहे असेही ते म्हणाले.

राज्यात ज्या कोरोनाविरोधी उपाययोजना चालू आहेत त्या केंद्र सरकारच्याच आहेत. राज्य सरकारने स्वतःच्या काही वेगळ्या उपाययोजना अद्यापही केलेल्या नाहीत. असे असताना जनतेचे मनोबल उंचावण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजनेची खिल्ली उडवताना आपण मा. पंतप्रधानांच्या पदाचा अनादर करत आहोत याचे तरी भान राखावे असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

From around the web