लॉकडाऊनचे कठोर पालन करू, मोदीजींच्या नेतृत्वाखाली कोरोनावर मात करू

 
भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांचा विश्वास

लॉकडाऊनचे कठोर पालन करू, मोदीजींच्या नेतृत्वाखाली कोरोनावर मात करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश निर्धाराने आणि एकजुटीने कोरोनाचा सामना करत असून आपल्या देशात कोरोनाची साथ नियंत्रणात राहिली आहे. अजून लढाई बाकी असून मा. पंतप्रधानांनी मंगळवारी केलेल्या सूचनेप्रमाणे ३ मे पर्यंत लॉकडाऊनचे कठोर पालन करू आणि कोरोनाविरोधातील युद्ध जिंकू, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, दि. २० एप्रिलपर्यंतचा कालावधी हा आपल्या सर्वांसाठी कसोटीचा असेल. या काळात आपण लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन केले आणि आपल्या परिसरात कोरोनाच्या साथीला रोखले तर त्यानंतर आवश्यक कामकाजासाठी काही सवलती मिळतील. नागरिकांनी संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करावे आणि आपल्या परिसरात कोरोनाची साथ वाढणार नाही, असा निर्धार करावा. आपला परिसर २० तारखेनंतर सवलती मिळण्यासाठी पात्र ठरला पाहिजे, असा निर्धार सर्वांनी करावा.

मा. पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे चेहऱ्यावर घरी तयार केलेला मास्क किंवा फेस कव्हर नियमित वापरणे, घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे, गरीबांना मदत करणे, लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमांचे पालन करणे, आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे, आपल्या नोकरीच्या अथवा कामाच्या ठिकाणच्या लोकांबद्दल संवेदना बाळगणे आणि कोरोनाविरोधी लढाईतील सैनिकांचा म्हणजेच डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस, सरकारी कर्मचारी यांचा सन्मान करणे या उपायांचा अवलंब करू या, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

त्यांनी सांगितले की, जगातील अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाची साथ खूपच नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खूप आधीपासून प्रतिबंधक उपाय केल्यामुळे आणि जनतेने सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आता आणखी थोडी लढाई बाकी असून संयम आणि निर्धाराच्या जोरावर मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण कोरोनावर मात करू.

ते म्हणाले की, कोरोनामुळे आलेल्या संकटात समाजातील दुर्बल घटकांना झळ पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गरीब कल्याण योजनेत आर्थिक उपाय केले आहेत. आगामी काळातही केंद्र सरकार गरीबांसाठी विशेष उपाययोजना करेल. त्याचसोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ठिकठिकाणी गरीबांना व संकटात सापडलेल्या नागरिकांना विविध प्रकारे मदत करत आहेत.

From around the web